परभणी शहरात नवीन नळजोडणीसाठी कृती आराखड्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 December 2020

परभणी महापालिकेच्या युआयडीएसएसएमटी व अमृत योजना या नवीन पाणी पुरवठा योजनेतून शहरभरात जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. गावठाण भाग, जुन्या व नव्या वसाहतींपर्यंत जलवाहिन्या पोहचल्या आहेत. ज्या भागात पुर्वी नळयोजनाच नव्हती त्या भागात नळजोडण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जिथे जुन्या योजनेतून पाणी पुरवठा होतो, त्या भागातील नागरीकांनी मात्र नवीन नळजोडणीकडे पाठ फिरवली आहे. 

परभणी - परभणी महापालिका गेल्या वर्षभरापासून नवीन पाणी पुरवठा योजनेवर नवीन नळजोडणी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अजुनही नळजोडणी मोहिमेला अपेक्षीत गती येत नाही. केवळ अपेक्षीत उद्दिष्टाच्या २० टक्के नळजोडण्या झाल्याचे चित्र असून या गतीने उद्दीष्टपुर्तीला पुढील दोन ते तीन वर्ष लागू शकतात. त्यामुळे आता प्रशासनाने नागरीकांना कृती आराखडा तयार करण्यासह यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. 

परभणी महापालिकेच्या युआयडीएसएसएमटी व अमृत योजना या नवीन पाणी पुरवठा योजनेतून शहरभरात जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. गावठाण भाग, जुन्या व नव्या वसाहतींपर्यंत जलवाहिन्या पोहचल्या आहेत. ज्या भागात पुर्वी नळयोजनाच नव्हती त्या भागात नळजोडण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जिथे जुन्या योजनेतून पाणी पुरवठा होतो, त्या भागातील नागरीकांनी मात्र नवीन नळजोडणीकडे पाठ फिरवली आहे. 

हेही वाचा - नांदेड - दिवसभरात ४० कोरोना पॉझिटिव्हची भर, ३४ रुग्ण कोरोनामुक्त 

तर नळजोडणीला येऊ शकते गती 
परभणी महापालिकेने वेळोवेळी नळजोडणी घेण्याचे आवाहन केले, इशारे दिले. परंतु गतीमध्ये फरक पडला नाही. एकीकडे योजनेचा दैनंदिन खर्च वाढत असताना पाणी कर देखील वसुल होत नाही. त्यामुळे पालिकेला आता इशारा नको तर कृती आहे. त्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर नळजोडणी घेणारे, न घेणाऱ्यांचे सर्वेक्षण करून वसुली लिपीक, स्वच्छता निरीक्षक, अभियंते यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. एसएमएस, फोनकरून तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन आग्रह धरल्यास निश्चितच या योजनेला गती मिळू शकते. पालिकेचे वसुली लिपीक मालमत्ता कर वसुलीसाठी जसे वारंवार गेल्यामुळे कर संकलीत होते, तसे झाले तर नळजोडणीला देखील गती येऊ शकते. 
 
५० हजार नळजोडण्यांचे उद्दीष्ट 
महापालिका क्षेत्रात ७४ हजार मालमत्ता असून पालिकेने ५० हजार नवीन नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रभाग समिती ‘अ’ मध्ये १२ ते १५ हजार नवीन नळजोडण्या घेणे अपेक्षीत असून वर्षभरात केवळ तीन हजार सातशे नळजोडण्या देण्यात आल्या. ‘ब’ मध्ये १८ ते २० हजाराचे उद्दीष्ट असून तेथे पाच ते सव्वा पाच हजार नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. ‘क’ मध्ये २० ते २२ हजाराचे उद्दीष्ट असून तेथे सव्वा दोन ते अडीच हजार नळजोडण्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. शहरात गेल्या वर्षभरात केवळ अकरा ते बारा हजार नागरिकांनी नळजोडण्या घेतल्या आहेत. 
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड -‘शक्ती’ कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची हमी द्यावी 

अनाधिकृत नळधारकांवर कारवाई हवी 
पालिकेने अनेक वेळा इशाले दिले, नळजोडण्या अधिकृत करण्याचे आवाहन केले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शहरात जुन्या वितरण व्यवस्थेवर २७ हजार नळजोडण्या असून तितक्याच अनाधिकृत असल्याचे सांगीतले जाते. एकवेळ अधिकृत नळधारक प्रतिसाद देतील परंतु कारवाई केल्याशिवाय अनाधिकृत नळधारक नवीन नळजोडणी घेण्याची शक्यता नाही. 
संपादन - अभय कुळकजाईकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action plan needed for new plumbing in Parbhani city, Parbhani news