Vidhan Sabha 2019 : माजी खासदारासह माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

प्रल्हाद कांबळे
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

- माजी खासदार एड. माने आणि माजी आमदार चव्हाण यांची घर वापसी
- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन

नांदेड : हिंगोलीचे माजी खासदार एड. शिवाजी माने आणि लोह्याचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची रविवारी (ता. 13) घरवापसी झाली. एड. माने यांनी बाळापूर येथे तर रोहिदास चव्हाण यांनी लोहा येथील प्रचार सभेत आपल्या हाती पुन्हा शिवधनुष्य घेतला. 

शिवसेना उमेदावारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रविवारी नांदेड व हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. लोहा (नांदेड) येथे शिवसेना उमेदवार मुक्तेश्‍वर धोंडगे व नांदेड दक्षिणच्या राजश्री पाटील आणि नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ  ठाकरे आले होते. त्यांच्या उपस्थितीत लोहा येथे माजी आमदार तथा मनसे नेते रोहिदास चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर, बाळापूर येथील जाहीर सभेत एड. शिवाजी माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते सध्या भाजप या पक्षात सक्रीय कार्यकर्ते म्हणून हिंगोली जिल्ह्यात काम करत होते. परंतु, लोकसभा निवडणुकीपासून ते शिवसेनेच्या संपर्कात होते. या दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे युतीच्या उमेदवाराचे पारडे जड झाल्याचे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ad shivaji mane and rohidas Chavhan enters in Shivsena