esakal | मुंबईहून परतलेल्या रुग्णांनी प्रशासनाची उडवली झोप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. परभणीला शहरातील मिलिंद नगर, रामपुरी (ता.पाथरी) आणि खपाटपिंपरी (ता.सोनपेठ) येथे प्रत्येकी एक रुग्ण गुरुवारी (ता.चार) आढळला आहे. यामुळे जिल्ह्याची एकुण रुग्ण संख्या ८९ झाली आहे.

मुंबईहून परतलेल्या रुग्णांनी प्रशासनाची उडवली झोप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी :  जिल्ह्यात बुधवारी (ता. तीन) रात्री नांदेड येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार दोन व्यक्तींचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. तर गुरुवारी (ता. चार) दुपारी आलेल्या अहवालात आणखी एका महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांत परभणीतील मिलिंदनगर, सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंपरी व पाथरी तालुक्यातील रामपुरीतील रुग्णांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र सील करण्यात आली आहेत. दरम्यान, मुंबई वरुन आलेल्या रुग्णांनी प्रशासनाची झोप उडवली आहे.
 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली असताना बुधवारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण ३२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील ३९ वर्षीय पुरुष, ब्रम्हवाकडी येथील २५ वर्षीय पुरुष व चिकलठाणा येथील २५ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. रात्री गंगाखेड तालुक्यातील तिघांना सुटी देण्यात आली. त्यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला. गुरुवारी (ता. चार) सकाळी आलेल्या अहवालात दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यात पाथरी तालुक्यातील रामपुरी व परभणी शहरातील मिलिंदनगर, तर दुपारी आलेल्या अहवालात खपाटपिंपरी (ता. सोनपेठ) येथील एका महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.


हेही वाचा व पहा :​ Video:  जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस फेकून भाजपचे आंदोलन

रामपुरीतील महिला कोरोनाबाधित
पाथरी :
रामपुरी (रत्नेश्वर) (ता. पाथरी) येथील एका महिलेचा २१ मे रोजी घेतलेला पहिल्या स्वॅबचा अहवाल १४ दिवसांनी ता. तीन जून रोजी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या महिलेला ता. चार जूनच्या पहाटे आरोग्य विभागाने गावातून हलवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून रामपुरीचा परिसर सील केला आहे.
  रामपुरी येथील एक महिला मुंबई येथून ता. २० मे रोजी टेम्पोमधून गावी आली होती. गावात आल्यानंतर  सदर महिला घरी राहात असल्याने काही ग्रामस्थांनी या महिलेस क्वारंटाइन करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर २१ मे रोजी सायंकाळी तहसीलदार एन.  यू. कागणे यांनी या महिलेस गावातून हलवत पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच रात्री आरोग्य विभागाने महिलेचा स्वॅब घेतला होता. त्या स्वॅबचा अहवाल २४ मे रोजी अनिर्णायक आल्यामुळे पुन्हा दुसरा स्वॅब ता. २४ मे रोजी घेण्यात आला. त्याचा अहवाल ता. २६ मे रोजी निगेटिव्ह आला. त्यानंतर २८ मे रोजी या महिलेला सुटी देण्यात येऊन घरात क्वारंटइन करण्यात आले. येथेपर्यंत सगळी प्रक्रिया ठीक होती. मात्र, या महिलेचा २१ मे रोजी घेतलेल्या पहिल्या स्वॅबचा रिपोर्ट  ता. तीन जून रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय सर्व यंत्रणा सतर्क होऊन पहाटे या महिलेला  ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले.

आरोग्य यंत्रणेतील गोंधळ

 पहिला रिपोर्ट आज पोझिटिव्ह आला असला तरी या पूर्वीच २६ मे रोजी दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे. दरम्यान, रामपुरी येथील परिसर प्रशासनाने सील केला आहे.

हेही वाचा :​ ‘कोरोनातून मी असा झालो बरा!’ -

रामपुरीत शुक्रवारपासून आरोग्य सर्वेक्षण
 रामपुरी (ता.पाथरी) येथील महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने गावातील ५५० घरांचा आरोग्य तपासणी सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे ११ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शिक्षकांचा समावेश आहे. या टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षिका नेमण्यात आल्या आहेत, तर दोन वैद्यकीय अधिकारी निगराणी ठेवणार आहेत. प्रत्येक पथकाला ५० घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. १४ दिवस सतत दररोज या पथकाकडून कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी के. पी. चौधरी यांनी दिली.

खपाटपिंप्रीतील युवकाला कोरोनाची बाधा
सोनपेठ : खपाटपिंप्री (ता. सोनपेठ) येथील एक युवक गुरुवारी (ता. चार) कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने तेथील ग्रामपंचायत हद्दीस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. संबंधित युवक हा नुकताच मुंबई येथून गावाकडे आल्याची माहिती मिळत असून त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापूर्वी शेळगाव (ता. सोनपेठ) येथील तब्बल आठजण कोरोनाबाधित झाले होते. ते लोकदेखील मुंबई येथूनच आले होते. तर आता मुंबईवरूनच आलेला युवकदेखील बाधित झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांनाच याचा धोका जास्त होत असल्याचे स्पष्ट होत आहे.


परभणी जिल्हा कोरोना मीटर  
एकूण रुग्णसंख्या ८९
उपचार घेत घरी परतलेले - ३१
उपचार सुरू-  ५६ 
मृत्यू - दोन