मराठवाडा, विदर्भ म्हणजे प्रेम न मिळालेला पोरगा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

औरंगाबाद - "मराठवाडा आणि विदर्भ हा असा पोरगा आहे, ज्याला पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्राचं प्रेम मिळालं नाही. ते प्रेम आता राज्य सरकारला द्यायचं आहे. ते प्रेम घेण्याची तयारी तुम्ही ठेवा,' असे आवाहन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून प्रादेशिकवादावरून होणाऱ्या राजकारणावर बोट ठेवले. 

औरंगाबाद - "मराठवाडा आणि विदर्भ हा असा पोरगा आहे, ज्याला पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्राचं प्रेम मिळालं नाही. ते प्रेम आता राज्य सरकारला द्यायचं आहे. ते प्रेम घेण्याची तयारी तुम्ही ठेवा,' असे आवाहन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून प्रादेशिकवादावरून होणाऱ्या राजकारणावर बोट ठेवले. 

"मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर'तर्फे आयोजित "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-2017' प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी ते बोलत होते. "औरंगाबाद व जालना हा पट्टा औद्योगिकदृष्ट्या सक्रिय लोकांचा पट्टा आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त औद्योगिकीकरण या भागात होईल. यासाठी आपण नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे काम झाल्यास आपण वीस वर्षे पुढे जाऊ इतकी क्षमता यात आहे,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच वेळी त्यांनी समृद्धी महामार्गावरून होणाऱ्या राजकारणावर बोट ठेवले. "एखाद्‌ दुसरा अपवाद सोडल्यास सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी खूप मदत केली आहे. मला काही प्रादेशिकवाद करायचा नाही; मात्र मी नेहमी एक पाहिले, की ज्या वेळेस एखादा प्रस्ताव हा पश्‍चिम महाराष्ट्राच्या हिताचा असतो, त्या वेळेस तेथे सर्व पक्ष एकत्रित येऊन तो पटकन कसा होईल, यासाठी प्रयत्न करतात; पण मराठवाडा व विदर्भाच्या हिताचे काही आले, की त्या ठिकाणी थोडेसे राजकारण येते. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी आम्हाला खूप मदत करत आहेत. विदर्भातील दोन-तीन लोकप्रतिनिधीही समजून घेतील. महाराष्ट्र व्यवस्थित करत असताना ज्या पोरावर आतापर्यंत कमी प्रेम केले, त्याला जास्त प्रेम दिले पाहिजे. मराठवाडा आणि विदर्भ हा असा पोरगा आहे, ज्याला पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्राचे प्रेम मिळाले नाही. ते प्रेम आता राज्य सरकारला द्यायचे आहे. ते प्रेम घेण्याची तयारी तुम्ही करा,' असे आवाहनही त्यांनी केले. 

लाल फीतशाही दिसली की कारवाई 
"मध्यंतरी महाराष्ट्रातील लाल फीतशाहीमुळे अनेक उद्योग राज्याबाहेर गेले; मात्र गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली. देशात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे; मात्र "इझ ऑफ डुइंग बिझनेस'चा परिणाम खालच्या स्तरावर दिसत नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. औद्योगिक एनए हा विषयच आम्ही संपविलेला आहे. आता तुम्ही जेथे पाहिजे तेथे अर्ज केला, की जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला थेट सनदच द्यायची आहे. किती दिवसांत सनद द्यायची याचे बंधन आहे. तेवढ्या दिवसांत तुम्हाला सनद मिळाली नाही, की थेट तुम्ही तक्रार करू शकतात. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेशच काढणार आहोत, की अशी कुठे अडवणूक होत असेल, तर त्या ठिकाणी तत्काळ निलंबित केले जाईल. लाल फीतशाही आम्ही खपवून घेणार नाही,' असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Advantage Maharashtra Expo -2017