हिंगोलीत कोरोनानंतर आता भूकंपाचा सौम्य धक्‍का

राजेश दारव्हेकर
Tuesday, 28 April 2020

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहा वाजता तीन वेळेस आवाज आले असून त्‍याची लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर ३.४ रिश्टर स्‍केल अशी नोंद झाल्याचे जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थापन कक्षाचे रोहिज कंजे यांनी सांगितले. तसेच  मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेसातनंतर एकापाठोपाठ एक असे तीन आवाज आले.

हिंगोली : वसमत, कळमुनरी व औंढा तालुक्‍यातील दहा ते पंधरा गावांत सोमवारी रात्री साडेदहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला असून त्‍याची लातूर येथील भूकंप मापक यंत्रावर ३.४ रिश्टर स्‍केल नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेसातनंतर एकापाठोपाठ एक असे तीन आवाज आले. यात कोणतीही हानी झाली नसली तरी तीन दिवसांपासून येणाऱ्या आवाजाने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्‍ह्यातील पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे आवाजाचे केंद्र मानले जात आहे. या गावात आवाज आल्यानंतर अनेक गावांत जमिनीतून गूढ आवाज येतात. अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. रविवारी (ता. २६) सकाळीदेखील आवाज आले. 

हेही वाचा- हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन

तीन वेळेस आवाज 

त्‍यांनतर सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहा वाजता तीन वेळेस आवाज आले असून त्‍याची ३.४ रिश्टर स्‍केल अशी नोंद झाल्याचे जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थापन कक्षाचे रोहिज कंजे यांनी सांगितले.
सोमवारी रात्री वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खारपखेडा, कुरुंदा, कोठारी, गिरगाव, कुरुंदा, चोंढीआंबा, बोरगाव खुर्द, मुरुंबा, खाजमापूरवाडी, माळवटा, पार्डी बुद्रुक, पांगरा बोखारे, खांबाळा, डोणवाडा, सुकळी आदी गावात आवाज आले.

औंढा, कळमनुरी तालुक्यात आवाज

 औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी, सोनवाडी, आमदरी, येहळेगाव सोळंके ; तर कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा, सिंदगी, कवडा, टव्हा, निमटोक, पेठवडगाव, बोथी, गोर्लेगाव, बिबथर, नांदापूर, हारवाडी, तेलंगवाडी, सापळी, भुरक्‍याची वाडी, कोपरवाडी, दांडेगाव, बोल्‍डा, येहळेगाव गवळी, असोला आदी गावांत आवाज आले.

रात्र काढली जागून

त्यामुळे सोमवारची रात्र गावकऱ्यांनी जागून काढली. ही माहिती खासदार हेमंत पाटील यांनी समजल्यानंतर त्यांनी आवाज आलेल्या विविध गावांत भेटी देऊन गावकऱ्यांना दिलासा दिला. मोकळ्या जागेवर या, सध्या कोरोनाचेदेखील संकट असल्याने सामाजिक अंतर पाळा, असे आवाहन त्यांनी केले. 

सलग तीन आवाज

तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून या घटनेची माहिती दिली. रात्रभर गावकरी जागे राहिल्यानंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ७.३०, ८.२५ व १०.१८ असे एकापाठोपाठ सलग तीन आवाज आले. तीन दिवसांपासून येत असलेल्या आवाजाने गावकरी मात्र भयभीत झाले आहेत. 

येथे क्लिक करा‘कोरोना’ जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांना ‘झूम’ ॲपद्वारे प्रशिक्षण, कुठे ते वाचा...

प्रशांत खेडेकर यांनी दिल्या भेटी

मंगळवारी सकाळी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी कळमुनरी तालुक्‍यातील बोल्‍डा, पोतरा, येहळेगाव गवळी आदी गावांत भेटी देऊन गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. मंगळवारी झालेल्या आवाजाची कोणतीही नोंद झाली नाही. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या आवाजाची रिश्टर स्‍केलवर ३.४ नोंद झाल्याचे जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थापन कक्षाचे रोहित कंजे यांनी सांगितले.

 

घाबरून न जाता काळजी घ्यावी

सोमवारी (ता. २७) झालेल्या आवाजाची नोंद झाली असून तो भूकंपाचा सौम्य धक्का होता. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून उपाययोजना केल्या जात आहेत.
-प्रशांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी, कळमनुरी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the corona in Hingoli, now a mild tremor Hingoli news