Latur News : कोरोनानंतरही लातूरचे पालकमंत्री ऑनलाइनच; विकासाचे प्रश्न प्रलंबितच

लातूरच्या विकासाचे प्रश्न प्रलंबितच, वीस दिवसाला येण्याचे आश्वासन हवेतच
after corona latur guardian minister girish mahajan online development work politics
after corona latur guardian minister girish mahajan online development work politicsSakal

लातूर : राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे एक वजनदारमंत्री आहेत. ते लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागतील असे लातूरकरांना वाटत होते. त्यात वर्षापूर्वी झालेली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक त्यांनी गाजवली.

धडाकेबाज निर्णय घेतले. लातूरला मी वीस दिवसाला येऊन आढावा घेण्याचे आश्वासन दिले. मंत्रालयात लातूरसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. पण या बैठकीनंतर ते ऑनलाइन झाले.

मुंबईत बसूनच बैठका घेण्यावर त्यांनी भर दिला. कोरोना काळात ऑनलाइन बैठकांचे सत्र त्यांनी कोरोनाच्या नंतरही सुरुच ठेवले. वीस दिवसाला येण्याचे आश्वासन तर हवेतच आहे. पण लातूरसोबतचे सुरक्षित अंतर ते कधी कमी करून विकासाचे प्रश्न सोडवणार हा लातूरकरांना प्रश्न पडला आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने पालकमंत्री महत्वाचे असतात. राज्यात महायुतीचे शासन आल्यानंतर पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले होते. त्यात गिरीश महाजन यांच्यावर लातूरची जबाबदारी देण्यात आली.

महाजन हे मंत्रिमंडळातील वजनदारमंत्री आहेत. त्यामुळे लातूरकरांना त्यांच्याकडून मोठ्या आशा होत्या. त्यात ता. तीन नोव्हेंबर २०२२ रोजी झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांनी गाजवली. अनेक प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावले होते. त्यामुळे लातूरकरांच्या आशा वाढल्या होत्या. पण नंतर मात्र त्या फोल ठरल्या आहेत.

या बैठकीनंतर महाजन लातूरकडे फारसे फिरकलेच नाहीत. ता. २० जानेवारी २०२३, ता. १२ जून २०२३ व ता. ८ जानेवारी २०२४ या तीन जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या. या तीनही बैठकीत त्यांनी ऑनलाइनच संवाद साधला.

ऑनलाइनच्या अनेक मर्यादा आहेत. लोकप्रतिनिधींना प्रश्न मांडता येत नाहीत, चर्चा करता येत नाही. दर चार महिन्यातून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणे अपेक्षीत असते पण सध्या सहा महिन्यातून एकदा ऑनलाइन बैठक होत आहे.

गेल्या दीड वर्षात महाजन केवळ चार वेळेस लातूरला आले आहेत. यात दोन वेळेस अतिवृष्टीत धावता दौरा व आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी ते येथे आले होते.

विकासाचे प्रश्न सुटेनात

पालकमंत्री महाजन यांच्याकडे सुरवातीला वैद्यकीय शिक्षण खाते होते. असे असताना सुद्धा येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रश्न सुटले नाहीत. लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही सुटला नाही.

जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य सोडले तर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या सदस्यांची अद्यापही वर्णी लागलेली नाही. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांची कामे देखील होत नसल्याने ते महाजनांवर नाराज आहेत.

इतकेच नव्हे तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लातूर दौऱ्यात पालकमंत्री महाजन नसले तरी क्रीडामंत्री संजय बनसोडे हे सल्लागार पालकमंत्री आहेत असे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले होते. पालकमंत्री महाजन किती दिवस मुंबईतूनच कारभार हाकणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com