परंडा तालुक्यात पुन्हा पावसाला सुरवात, कांद्याचे मोठे नुकसान

आनंद खर्डेकर
Sunday, 18 October 2020

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा परंडा तालुक्यात सुरवात झाली असून रविवारी (ता.१८) दुपारी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.

परंडा ( जि.उस्मानाबाद)  : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा तालुक्यात सुरवात झाली असून रविवारी (ता.१८) दुपारी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वच राजकीय पक्षांचे नेते पाहणी दौऱ्यावर येत असताना पाऊसही पुन्हा दौऱ्यावर आल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून तालुका परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सीना-कोळेगाव, चांदणी, खासापुरी, पांढरेवाडी हे प्रकल्प ओसंडून वाहत होते.

अनेक पाझर तलाव तुडूंब भरले, तर खंडेश्वरवाडी, काळेवाडी हे प्रकल्प फोडून पाणी सोडून द्यावे लागले. एकाच दिवशी १७० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेले पिक वाया गेले. धरणे भरल्यानंतर झालेल्या पावसामुळे सर्वच नदी-नाले खळाळून वाहत आहेत.

भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोनारी, डोणजा, मुगाव, देऊळगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. अनेकांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या पावसाचा फटका तुरीच्या पिकालाही बसला आहे. तुरीचे उत्पादन घटण्याचा धोकाही वाढला आहे. या पावसामुळे नळी, खैरी या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. पाहणी दौऱ्यावर येणाऱ्या सर्व नेत्यांकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again Rain Starts In Paranda Block, Onions Huge Damage