भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

अविनाश काळे
Sunday, 18 October 2020

उमरगा, लोहारा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता.१८) सास्तूर, राजेगाव व कवठा येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलंयकारी भूकंपानंतर तातडीने धावून आलेले तत्कालीन मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सास्तूर, राजेगाव व कवठा येथील भूकंपगस्त भागातील शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. उमरगा, लोहारा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता.१८) सास्तूर, राजेगाव व कवठा येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

साहेब, आमचं सगळच शेत वाहून गेल, तुळजापूरातील शेतकऱ्यांनी मांडली पवारांकडे व्यथा ! 

पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रारंभी राजेगावच्या शेतकरी गहिवरून सांगत होते, साहेब, तुम्ही आम्हाला भूकंपानंतर अगदी काही क्षणांत येऊन धीर दिलात. भौतिक पूर्नवसनाबरोबरच मानसिक स्थैर्य दिलात. त्या आठवणी अजूनही दाटून येतात. भूकंपानंतर पुन्हा पावसाच्या आपत्तीने आम्हा शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. पिकाबरोबरच शेतीही खरडून गेली आहे.

आता रब्बीची पेरणीही व्हायची शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत आम्हाला मदतीची गरज आहे, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी तुमची नेहमी मदत झाली आहे. या संकटातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आमचा तुमच्यावर विश्वास आहे असे अविनाश देशमुख म्हणाले. या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, किरण गायकवाड, सुनिल साळूंके आदींची उपस्थिती होती.

 

काळजी करू नका
श्री.पवार यांनी शेती नुकसानीची पाहणी केल्यानंतर राजेगाव शिवारात शेतकऱ्यांशी बोलताना भूकंपाच्या प्रसंगाची आठवण करून दिली. त्यानंतर पून्हा राजेगावकरांचे बोलावणे आले. खरोखरच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत राज्याच्या मदतीवर मर्यादा येतात. त्यासाठी केंद्र सरकारची मदत महत्त्वाची आहे. येथील खासदार, आमदारांना सोबत घेऊन मदतीसाठी दिल्लीला जावे लागणार आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारची मदत मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही  प्रयत्नशील आहोत. तुम्ही काळजी करू नका असा विश्वास श्री.पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

खासदार, आमदारांना बोलण्याची संधी
दौऱ्या दरम्यान शरद पवार यांनी खासदार निंबाळकर यांना बोलण्याची व वस्तूस्थिती मांडण्याची संधी दिली. श्री. निंबाळकर व आमदार चौगुले यांनी श्री. पवार यांच्यासमोर शेती नुकसानीबाबत विवेचन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनीही या परिसरातील शेती नुकसानीबाबतची सविस्तर माहिती श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Visits Heavy Rain Affected Blocks Osmanabad News