तेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी किटनाशके, खते, बियाणी विक्रीसाठी परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून तेराशे रुपयांची लाच घेताना लाचखोर कृषी सहायकास सोमवारी (ता.१५) ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई हिंगोली येथील एसीबीच्या पथकाने केली. 

हिंगोली ः कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी किटनाशके, खते, बियाणी विक्रीसाठी परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून तेराशे रुपयांची लाच घेताना लाचखोर कृषी सहायकास सोमवारी (ता.१५) कृषी अधीक्षक कार्यालयात सापळा रचला असता लाच स्विकारताना त्यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, सेनगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक प्रदीप शिंदे यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गुण नियंत्रण शाखा व सांख्यिकी शाखेचा पदभार दिला होता. तक्रादाराला कृषी केंद्र सुरू करून त्यात किटकनाशके, रासायनिक खते, बियाणे विक्रीसाठी परवाना तयार करून त्यावर त्यांच्या ओळखीने कृषी अधीक्षक यांची स्वाक्षरी करण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून शिंदे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 

हेही वाचा - गंभीर प्रकरण, पोलिस उपनिरीक्षकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चुकीची वागणुक

पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न
या रकमेपैकी पूर्वी एक हजार सातशे रुपयांची लाच घेतली होती. उर्वरित तेराशे रुपयासाठी लाचखोर कृषी सहायक प्रदीप शिंदे यांनी सारखा तगादा लावला होता. ‘पैसे दे आणि परवाना घेऊन जा’, मात्र तक्रारदार यांची उर्वरित पैसे देण्याची मानसिक इच्‍छा नसल्याने त्याने कृषी सहायकाच्या जाचाला कंटाळून लाचलुचपत कार्यालय गाठून थेट लाच मागितल्याची तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक गायकवाड यांनी तक्रारदारच्या तक्रारीची सोमवारी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 

हेही वाचा - शैक्षणीक साहित्याच्या बाजारपेठेतील किलबिलाट गायब !

कार्यालयाच्या कक्षात लावला सापळा 
पडताळणीनुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात त्याच्या कामकाजाच्या कक्षात दुपारी सापळा रचला असता तेराशे रुपयांच्या लाचेसह लाचखोर शिंदे यास पथकाने ताब्यात घेतले. 

अडीच महिन्यात पाच ते सात जणांवर कारवाई
पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक गायकवाड यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफूने यांच्या पथकाने केली. हनुमंत गायकवाड यांनी पदभार घेतल्यानंतर लॉकडाउन काळात मागील अडीच महिन्यात पाच ते सात जणांवर कारवाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural assistant caught taking bribe of Rs one thousand three hundred, hingoli news