शेतकऱ्याने बनविले दुचाकीच्या साहाय्याने चालणारे फवारणी यंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture news Farmer built two-wheeler Spraying machine kej marathwada

शेतकऱ्याने बनविले दुचाकीच्या साहाय्याने चालणारे फवारणी यंत्र

केज : सध्याच्या परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. वाढता उत्पादन खर्च व मजुरांची वाणवा लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने उपलब्ध साधनांचा वापर करून अत्यंत कमी खर्चात दुचाकीच्या सहाय्याने चालणारे फवारणी यंत्र बनविले आहे. या यंत्राने फवारणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होते. शिवाय वेळ व मानवी श्रमही कमी लागतात. हे यंत्र कमी खर्चात तयार होत असल्याने ते शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे देखील आहे.

तालुक्यातील अंबाजोगाई-कळंब या रस्त्यावरील पाथरा या छोट्याशा गावात मागील पंधरा वर्षांपासून प्रवीण पवार व अपर्णा पवार हे दांपत्य राहते. पत्नी अपर्णा पवार या सरपंच आहेत. ते स्वतः शेती करतात. सध्याच्या परिस्थितीत शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्याने खर्च वजा जाता हातात येणारे उत्पन्न खूप कमी असते. त्यातच तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने फवारणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे. यामुळे प्रवीण पवार यांनी स्वतः फवारणीचे यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला.

रोजच्या वापरात असलेली दुचाकी, भंगारातील साहित्य, दोन कॅन, फवारणीचे नोजल व पाइप यांची जमवाजमव करून केवळ चार हजार रुपये खर्च करून त्यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे. अशाप्रकारे तयार केलेल्या यंत्राद्वारे एक जण दिवसाला वीस-पंचवीस एकर क्षेत्रावर फवारणी करू शकतो. फवारणीसाठी लागणारे पाणी दुचाकीनेच आणले जाते. यामुळे पाठीवर फवारी यंत्राचे ओझे घेऊन फिरायची गरज भासत नाही. ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणे अनेकांना परवडत नाही. अशा शेतकऱ्यांना या जुगाड यंत्राचा वापर सहज करता येऊ शकतो.

या दुचाकीवर बनविलेल्या फवारणी यंत्राच्या लोखंडी साच्यास कमी-जास्त उंची करण्याची सोय असल्याने सोयाबीन तसेच ऊस पिकातही फवारणी करता येते. फवारणीनंतर शेतकरी साचा काढल्यावर दुचाकीचा दैनंदिन वापरासाठी वापरू शकतो असे शेतकरी प्रवीण पवार यांनी सांगितले.

या प्रयोगशील शेतकऱ्याने दुचाकीवर बनविलेले फवारणी यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र फवारणी करताना कीटकनाशक अंगावर येणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबर यात काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का? यासाठी अभियंत्याचे मार्गदर्शन घेता येईल.

-अतुल वायसे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

Web Title: Agriculture News Farmer Built Two Wheeler Spraying Machine Kej Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..