चारही कृषी विद्यापीठांची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू

कैलास चव्हाण
मंगळवार, 2 जुलै 2019

प्रवेश प्रक्रिया
 ता. २६ जुलै - अंतिम गुणवत्ता यादी
 ता. २८ जुलै - पहिल्या प्रवेश फेरीची यादी
 ता. ३ ऑगस्ट - पहिल्या फेरीनंतरच्या रिक्त जागांची यादी
 ता. ६ ऑगस्ट - दुसऱ्या फेरीची यादी 
 ता. १२ ऑगस्ट - तिसऱ्या फेरीची यादी 
 ता. १९ ऑगस्ट - चौथ्या फेरीची यादी 
 ता. २४ ऑगस्ट - अंतिम रिक्त जागांची यादी 
 ता. २६ ते २९ ऑगस्ट - स्पॉट ॲडमिशन 

परभणी - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सन २०१९-२० शैक्षणिक वर्षातील पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी संबंधित १७७ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या १४ हजार ५७७ जागांसाठी अर्ज करण्याची ता. १० जुलै ही अंतिम मुदत आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद व संशोधन परिषदेच्या वतीने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशा चारही विद्यापीठांची पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ता. २९ जूनपासून अर्ज मागवले आहेत. ता. १० जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून ता. १५ जुलै रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ता. १६ ते २० जुलैदरम्यान ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर असून मात्र, प्रथम प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ता. १९ ऑगस्टला सुरू होणार आहेत. ता. २६ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी लागणार आहे.

कृषीच्या शासकीय २० महाविद्यालयांत दोन हजार ७२ जागा आहेत. तर ७४ खासगी महाविद्यालयांत सात हजार ८९० जागा आहेत. उद्यानविद्यात शासकीय २२० आणि खासगी ५६०, वनविद्या शास्त्राच्या ६४, मत्स्यशास्त्राच्या ४०, अन्नतंत्रच्या शासकीय १०४ आणि खासगी एक हजार ४८० जागा आहेत. जैवतंत्रज्ञानाच्या शासकीय ८० आणि खासगी ९२०, कृषी अभियांत्रिकीच्या शासकीय २४७ आणि खासगी ८८०, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात ४० जागा आहेत. एकूण शासकीय २ हजार ८४७ आणि खासगी ११ हजार ७७० अशा एकूण १४ हजार ५७७ जागा आहेत.

हे आहेत अभ्यासक्रम 
बीएस्सी (कृषी), बीएस्सी (उद्यानविद्या), बीएस्सी (वनशास्त्र), बीएफएस्सी, बीएस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान), अन्नतंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture University Graduation admission process Start Education