मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बुधवारी (ता. 26) श्री. पवार यांच्या उपस्थितीत सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात विभागीय बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, या सरकारने कर्जमाफीची फक्त घोषणा केली. त्याचा अद्यापही अनेकांना लाभ मिळालेला नाही. या सरकारच्या काळात गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललंय. रॉकेल, साखर रेशनवर बंद केले. गरीबांच्या हक्‍कावर गदा आणला जात आहे.

दुसरीकडे बॅंकांना लुटणारे सर्वच जण पळून जात आहेत. त्यामुळे डबघाईला आलेल्या बॅंकांचे चांगल्या बॅंकांसोबत विलीनीकरण केले जात आहे. अनेक भागात पक्षाची ताकद नसली म्हणून कार्यकर्त्यांनी प्रयत्न करने सोडू नये. बेरजेचे राजकारण करण्यास शिकावे. आपल्या गावचा सरपंच हा आपल्या पक्षाचा आहे का, हा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा. आरएसएसच्या लोकांपासून सावध रहा. लोकांना बदल हवाय. तो पर्याय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपात जनतेला द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, भाऊसाहेब तरमळे, जयसिंग सोळुंके यांचे भाषणे झाली. 

सरकार चालवायला लायकी लागते 
सध्याचे सरकार नाकर्ते आणि फेकू आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्‍वासनाचे काय झाले, असे प्रश्‍न आता विचारायला हवेत. गरीबाच्या कामाला अग्रक्रम द्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरीही काहीही कामे करीत नाहीत. मुळात सरकार चालविण्यासाठी लायकी लागते. नेमकी तिच यांच्याकडे नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar said drought Should declares in Marathwada