सरकारने घेतली दखल; गुरू गोविंदसिंग अध्यासनाला गती

सुशांत सांगवे
Wednesday, 1 January 2020

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ कोटी रक्कम विद्यापीठाला दिली. त्यानंतर केंद्र सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून २५ कोटी रुपये विद्यापीठाला दिले. इतकी मोठी रक्कम देशातील कुठल्याही अध्यासनाला मिळाली नाही. पण रक्कम येऊनही हे अध्यासन उभे राहत नव्हते.

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी वेगवेगळे ठराव मांडले जातात. पण, ते कागदावरून प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत. मात्र, २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनातील एक ठराव पाच वर्षाने का होईना प्रत्यक्षात उतरत आहे. त्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने राज्य सरकारला पत्र पाठविले. सरकारनेही त्याची तातडीने दखल घेतली. त्यामुळे नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरू गोविंदसिंग यांच्या नावाचे अध्यासन आकाराला येत आहे.

गुरू गोविंदसिंह यांची जयंती गुरुवारी (ता. २) साजरी केली जाणार आहे. पण त्यांच्या नावाचे अध्यासन गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात गुरू गोविंदसिंग यांच्या नावाचे जागतिक अध्यासन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारले जावे, असा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनातही याबाबतची मागणी करण्यात आली. 

वाचा - अशी निघणार साहित्यज्योत

त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ कोटी रक्कम विद्यापीठाला दिली. त्यानंतर केंद्र सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून २५ कोटी रुपये विद्यापीठाला दिले. इतकी मोठी रक्कम देशातील कुठल्याही अध्यासनाला मिळाली नाही. पण रक्कम येऊनही हे अध्यासन उभे राहत नव्हते.

राज्य सरकारने दखलही घेतली

अध्यासन उभारणीकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहद संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपली खंत व्यक्त केली. याबाबत ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार म्हणाले, ‘‘गुरू गोविंदसिंग हे शुर योद्धे होते. तसेच ते लेखक, कवी, नाटककारही होते. त्यांच्या नावाचे अध्यासन नांदेडमधील विद्यापीठात उभारले जावे, असा आमचा आग्रह होता. सरकारनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सरकारकडून रक्कम येऊनही विद्यापीठाने आणि विद्यापीठाने नेमलेल्या समितीने सकारात्मक पावले अद्याप उचलली नाहीत, अशी खंत आम्ही पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. या पत्राची राज्य सरकारने दखलही घेतली आहे.’’

गुड न्यूज - अजिंठ्याच्या जंगलात येऊन गेला वाघ

धार्मिक केंद्रही बनू नये

गुरू गोविंदसिंग अध्यासन हे केवळ एका इमारतीपुरते असू नये किंवा ते धार्मिक केंद्रही बनू नये. देशाच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्र-पंजाब यांच्या नात्याचे केंद्र बनावे, अशी अपेक्षाही नहार यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे. दरम्यान, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन म्हणाले, गुरू गोविंदसिंग अध्यासनाची इमारत उभी राहण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम गुरूवारपासून (ता. २) सुरूही होणार आहे. पुढील दीड वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad Latur News