फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाच्याने टाकला वादावर पडदा

सुशांत सांगवे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

  • लोकं येताहेत; पण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी
  • वसईतील नागरिकांनी लोकवर्गणीतून जमा केला 15 लाखाचा निधी

उस्मानाबाद : वसईतील काही नागरिक साहित्य संमेलनाला येत आहेत. पण ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत करण्यासाठी. लोकवर्गणीतून त्यांनी सुमारे 15 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. त्यामुळे विनाकारण वाद होऊ नये, अशी अपेक्षा नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

उद्घाटक पद्मश्री ना. धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाचे फोन

शंभरहून अधिक ख्रिश्चन धर्मगुरूंना घेऊन फादर फ्रान्सिस दिब्रिटो उस्मानाबादमध्ये आले आहेत, अशी टीका त्यांच्यावर सध्या होत आहे. ब्राह्मण संघटनेने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या वाद सुरू आहे. याबाबत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे भाचे जेम्स लोबो म्हणाले, की आम्ही कोणालाही घेऊन आलेलो नाही. आमच्यासोबत फक्त आमचे कुटुंबीय आहेत. शंभरहून अधिक लोक आम्ही आणलेले नाहीत. जे कोणी येणार असतील ते उत्स्फूर्तपणे येतील.

केंद्र सरकारने केली मराठीची थट्टा

वसईतील नागरिकांनी एकत्र येऊन निधी जमा केला आहे. उस्मानाबाद भागात बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी काही शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ते आर्थिक मदत करणार आहेत. यासाठी जवळपास 15 लाख रुपये जमा केले आहेत. हा निधी संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात संमेलनाच्या आयोजकांना दिला जाणार आहे. हा निधी देण्यासाठी वसईतील काही लोक येथे येतील. शिवाय, फादर हे वसईतील असल्यामुळे तेथील काही लोक उत्स्फूर्तपणे संमेलनाला येऊ शकतात. कारण त्यांना फादर संमेलनाचे अध्यक्ष झाले, याचा आनंद आहे, असेही जेम्स लोबो यांनी 'सकाळ' ला सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News