Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके

सुशांत सांगवे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

  • प्रकाशकांनी व्यक्त केला संताप
  • विक्रेत्याला काढले बाहेर

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : लेखक, प्रकाशक आणि वाचकांचा उत्सव असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, तेही ग्रंथ दालनाजवळ पायरटेड पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचा प्रकार काही प्रकाशकांच्या निदर्शनास आला. त्यांनी संताप व्यक्त करत आयोजकांच्या मध्यस्तीने संबंधित विक्रेत्याकडील पुस्तके जप्त करून त्यास बाहरेचा रस्ता दाखविण्यात आला.

पायरटेड पुस्तके विकणे, हा गुन्हा असताना संमेलनासारख्या ठिकाणीच पायरटेड पुस्तके विकली जात होती. हा प्रकार 'ग्रंथाली'चे सुदेश हिंगलासपूरकर यांना आढळून आला. अशा विक्रीवर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी वेगवेगळे प्रकाशक एकत्र आले. त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आयोजकांनी संबंधित विक्रेत्याला बाहेर काढले.

हिंगलासपूरकर म्हणाले, अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टोलच्या बाजूला 'आमचा बाप आन आम्ही' आणि 'कोल्हाट्याच पोर' ही पायरेटेड पुस्तके आढळून आली. याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. 'कोल्ह्याट्याच पोर'ची छापील किंमत 125 रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक 150 रुपयांना विकले जात होते. 'आमचा बाप आन आम्ही' ची छापील किंमत 150 रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे. हा चोरीचा प्रकार असून, मराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे ८ विक्रेते आहेत. ठराविक पुस्तकांना वाचकांकडून चांगली मागणी असते, म्हणून ते असे प्रकार करतात. 'बलुतं' या पुस्तकाला 40 वर्षानंतरही मागणी आहे.

हेही वाचा - फादर फ्रान्सिस दिब्रिटो काय म्हणतात?

साहित्य संमेलनात पायरटेड पुस्तके विकणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करत असतो. त्यात असे गैरव्यवहार होत असतील तर हे दुःखद आहे. पायरसी हा गुन्हा आहे. सरकारने कडक कायदा करून यावर बंदी आणावी. कारण, अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे वाचनसंस्कृतीसाठी घातक आहे. 
- सुदेश हिंगलासपूरकर, प्रकाशक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News