शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांची बैठक बोलविणार, परभणीचे खासदार देणार लढा

गणेश पांडे
Tuesday, 8 September 2020

परभणी जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा असून त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली जाणार आहे. त्या माध्यमातून या मागणीचा रेटा वाढविला जाईल, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी (ता.आठ) पत्रकार परिषदेत दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाचक ठरणारा ७० : ३० चा फॉर्मुला रद्द करण्यात आला, याबद्दल शासनाचे मी आभार मानतो. 

परभणी : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाचक ठरणारा ७० : ३० चा फॉर्मुला रद्द करण्यात आला. आता परभणी जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा असून त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली जाणार आहे. त्या माध्यमातून या मागणीचा रेटा वाढविला जाईल, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी (ता.आठ) पत्रकार परिषदेत दिली.

वैद्यकीय प्रवेशात मराठवाड्यातील विद्यार्थांसाठी जाचक ठरलेला ७० : ३० टक्केचा फॉर्मुला रद्द करावा यासाठी आपण वारंवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी बोललो आहोत. शासनाने हा निर्णय जाहीर करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दुर केला आहे. 

हेही वाचा - पॉलिटेक्निकल प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गोरक्षणच्या जागेसाठी पत्र 
आता परभणी जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी रेटा वाढविण्याची गरज आहे. महाविद्यालय आपल्याला मंजूर झालेले आहे. परंतू, जागेअभावी त्याची प्रक्रिया रखडली असून या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना गोरक्षणच्या जागेसाठी पत्र दिले आहे असेही खासदार संजय जाधव यांनी सांगितले. गोरक्षणच्या जागेवर काही तांत्रिक अडचणी येत असतील तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जागेचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. या जागेसाठी आपण कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनाही पत्र दिले आहे. जागेअभावी महाविद्यालयाची प्रक्रिया रखडू नये अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

हेही वाचा - नियमांचे पालन करून नाट्यगृहे सुरु व्हावीत

फॉर्मुला रद्द झाल्याबद्दल शासनाचे आभार 
मागणीचा रेटा वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक लावली जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल असे त्यांनी सांगितले. ७० : ३० टक्केचा फॉर्मुला रद्द झाल्याबद्दल आपण शासनाचे आभार मानतो. आता परभणी जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी सर्वांनी रेटा लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी विधानसभा प्रमुख माणिक पोंढे पाटील, अर्जून सामाले आदींची उपस्थिती होती.
 

संपादन : राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Party Meeting Called The Government Medical College Parbhani News