esakal | नियमांचे पालन करून नाट्यगृहे सुरु व्हावीत  
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नाट्यगृह बंद असले तरी विजेच्या देयकासोबत देखभाल दुरुस्तीचा खर्च मात्र नाट्यगृहांच्या मालकांचा सुरूच आहे. टाळे लागल्याने नाट्यकलावंतांसोबतच नाटकाशी संबंधित हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत. 

नियमांचे पालन करून नाट्यगृहे सुरु व्हावीत  

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  कोरोनाची झळ सर्वच व्यवसायांवर पोहचली आहेच. त्यापेक्षाही जास्त झळ ही सांस्कृतिक क्षेत्राला पोहोचली आहे. कारण नाटकाच्या ओढीने नाटकवाले तयार होत असतात आणि नाटकच होणार नसेल तर नाटकवाले जगतील कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कोरोनाचे संकट संपले नसले तरी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टाळेबंदीला शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेने जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. नाट्यक्षेत्राचा वनवास मात्र अजूनही संपलेला नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळून सादरीकरणाचा विचार प्रशासनाला अद्यापही शिवलेला नाही. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मनोरंजन, प्रबोधनाचा भाग असलेल्या नाट्यक्षेत्राकडे सामान्य माणूस ढुंकूनही बघणार नाही. मात्र, नाट्यक्षेत्रावर अनेकांची रोजी-रोटी अवलंबून आहे. ती आज ठप्प झाली आहे.  

हेही वाचा - Video - नांदेडमधील कोरोना बाधित रुग्णांना साईप्रसादचा आधार

ओटीटी, ऑनलाइन हा पर्याय ठरत नाही 
कोरोनामुळे नाटकांचे सादरीकरण थांबले आहे. बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शनही होऊ शकले नाही. चित्रपटगृहांना टाळे लागल्याने अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. पुढील काही महिने ते अशक्‍य आहे. त्यामुळे त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधत चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपट आणि नाटक यामध्ये मोठा फरक आहे. नाटकांचे सादरीकरण व्यासपीठावरच उठावदार होते. मात्र, नाटक ऑनलाइन होणार असेल तर त्याला नाटक कसे म्हणता येईल, हा मूलभूत प्रश्‍न आहे. 

हे देखील वाचाच - मराठवाड्यासह परभणीकर जिंकले! ७०ः३० फॉर्मुला रद्द

शेकडो नाट्यगृहांना टाळे 
नांदेडमध्ये कुसुम आणि डाॅ. शंकरराव चव्हाण असे दोन नाट्यगृहे आहेत.  नाटकांवर केवळ नाटकवाल्यांचीच उपजीविका अवलंबून आहे असे नाही. तिकीट खिडकीवरील तिकीट कलेक्‍टरपासून ते पोस्टर्स बॅनर लावणारे व पडदा ओढणाऱ्यांच्याही उपजीविकेचा प्रश्‍न आहे. नाट्यगृह बंद असले तरी विजेच्या देयकासोबत देखभाल दुरुस्तीचा खर्च मात्र नाट्यगृहांच्या मालकांचा सुरूच आहे. टाळे लागल्याने नाट्यकलावंतांसोबतच नाटकाशी संबंधित हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत. 

नियमांचे पालन करून नाटके करता येतील 
नाट्यरसिक सुज्ञ असल्यामुळे सोशल डिस्टन्स, मास्क अशा मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. नाट्यगृहांची आसनक्षमता बघून नाट्यगृहे सुरू केल्यास कोरोनाच्या धास्तीमुळे निर्माण झालेला निरुत्साह दूर होऊन जनसामान्यांमध्ये चैतन्य पसरेल. त्यासाठी शासनाने नाट्यगृहे सुरू करावी, असी मागणी आता नांदेडमधील नाट्यकर्मींमधून होत आहे.

मागील वर्षीचे पैसे शासनाने द्यावे
डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या राज्य नाट्य स्पर्धांचे पैसे शासनाने अद्यापही दिलेले नाही. नांदेडमध्ये या स्पर्धेत १२ ते १५ नाटकांचे प्रयोग झाले होते. त्यांना सादरीकरणासाठी प्रत्येक सहा हजार आणि जाणे-येण्याचे भाडे शासन देत असते. हे पैसे शासनाने तातडीने द्यावे, एवढीच अपेक्षा आहे.
- गोविंद जोशी (नाट्यकर्मी, नांदेड)