esakal | आधीच पुलाची उंची कमी, त्यात पावसाने लेंडी नदीला पुर, बारा गावांचा संपर्क तुटला 
sakal

बोलून बातमी शोधा

PRB20A02615

परभणीसह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले भरले तर धरणासह प्रकल्पातील पाणीसाठा वाढला. पालमजवळील लेंडी नदीला पूर आल्याने रस्ता बंद पडला होता. या वेळी नदीच्या दोन्ही बाजूला ग्रामस्थ अडकले होते. तर जिंतूर शहरात झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच भाजी मंडइ परिसरात पाण्याचे लोट रस्त्याने वाहत होते. 

आधीच पुलाची उंची कमी, त्यात पावसाने लेंडी नदीला पुर, बारा गावांचा संपर्क तुटला 

sakal_logo
By
गणेश पांडे

पालम ः तालुक्यात सोमवारी मध्यरात्री नऊच्या सुमारास मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे लेंडी नदीला पूर येत नदीपलीकडील १२ गावांचा संपर्क तब्बल तीन तास तुटला होता. नदीपलीकडील नागरिकांना गावाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा मार्ग अवलंबावा लागला. तालुक्यातील अनेक दिवसापासून खंडण पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा परिसरात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. पडलेल्या पावसामुळे व लेंडी नदीच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे परिसरात पावसाचे पाणी पडताच या नदीला पूर येण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. असाच काहीसा प्रकार सोमारी मध्यरात्री नऊच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे लेंडी नदीपलीकडील पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, नाहा, नाहलगाव, गणेशवाडी तर दुसऱ्या बाजूने फळा आररखेड, सोमेश्वर घोडा, उमरखडी अशा बारा गावांचा पुरामुळे संपर्क तुटला.

परभणी शहरासह आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. तसेच जिंतूर, सेलू, झरीसह सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले भरले तर धरणासह प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रात्री पाऊस येईल याची शक्यता वर्तविली जात होती. परभणी शहरात गेल्या दोन दिवसापासून थोडा अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यात सोमवारी (ता.१४) रात्री अर्धा पाऊन तास तुरळक पाऊस झाला. परंतू, मंगळवारी (ता.१५) सकाळपासून दिवसभर आकाशात पावसाचे ढग जमलेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाश काळ्या कुट्ट ढगाने व्यापले होते. त्यानंतर जोरदार पावसााला सुरुवात झाली. हा पाऊस तब्बल पाऊन तास बरसला. या पावसाने शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडली होती. सखल भागात पाणी साचले होते. 

जिंतूर शहरात जोरदार पाऊस 
जिंतूर शहरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस एक तास सुरुच होता. यामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. तसेच सेलू शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. 

झरी परिसरात पावसाची जोरदार हजेरी 
झरी परिसरात मंगळवारी सकाळपासूनच सूर्यदर्शन नव्हते. त्यामुळे पाऊस येण्याचा अंदाज होता. दरम्यान दुपारी साडेचारच्या सुमारास दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान निर्माण झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हा पाऊस सर्वात चांगला असल्यामुळे निदान पाणी वाढण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - सिध्देश्वरचे सर्व दरवाजे पाच फुटाने उघडले, तर इसापूरचे दोन दरवाजे उघडले

मासोळी प्रकल्प शंभर टक्के भरला 
जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे तलाव फुल भरले असल्याने आगामी काळात भेडसावणारी पाणी टंचाईचे संकट अद्याप तरी टळले असल्याचे दिसत आहे. गंगाखेड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे गंगाखेडवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होता. या पावसाळ्यात या प्रकल्पात पुरेशे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण असताना (ता.१३ व १४) सप्टेंबरच्या पडलेल्या पावसाने मासोळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. आता हा प्रकल्प ओव्हरफ्लोही झाला आहे. त्यामुळे गंगाखेड वासियांसह इसाद व इतर बारा गावातील शेतकरी सुखावले आहेत. या मासोळी प्रकल्पावरच गंगाखेड शहरासह काही खेड्यापाड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच सिंचनही अवलंबुन आहे. तालुक्यातील सर्वात मोठा जलाशय म्हणून मासोळी प्रकल्पाची गणना आहे. 

हेही वाचा - प्लाझ्मा थेरपी अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी वरदान, कशी? ते वाचाच

येलदरी धरणाचे चार दरवाजे बंद 
येलदरी धरणाचे सोमवारपासून दहा उघडण्यात आले होते. मंगळवारी (ता.१५) जलाशयातील आवक कमी झाल्याने दुपारी दीडच्या सुमारास चार दरवाजे बंद करण्यात आले. आता एक, तीन, पाच, सहा, आठ क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडून १२६५९.८९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. तर विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे सोडण्यात येणारा विसर्ग दोनहजार ५०० क्युसेक आहे. याप्रमाणे एकूण १५१५९.२८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. 

 
पुलाची उंची वाढवा अन्यथा आंदोलन...
सातत्याने हा प्रकार होत असतानाही याकडे संबंधित विभागाने मात्र लक्ष न दिल्याने नदीपलीकडील नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागतो. लेंडी नदी पुलाची उंची अल्प असल्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग सातत्य बंद पडून नदीपलीकडील १२ गावातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भविष्यात या फुलाची उंची वाढ न केल्यास नदीपलीकडील ग्रामस्थांच्यासोबत आंदोलन करण्याचा इशारा फळा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोकराव पोळ यांनी दिला.

संपादन ः राजन मंगरुळकर