
नांदेड : अनेक प्रवाशी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर मराठवाडा एक्सप्रेसची वाट पाहत होते. स्थानकात प्रवाशांची गर्दी होती. गाडी आल्यानंतर जो तो बसण्याची घाई करत होता. दिलीप ठाकूर यांना दुरुन पाहून त्यांचा मित्र त्या डब्याजवळ आला. पाठीमागून दिलीपभाऊ अशी हाक मारली. कुणीतरी आवाज देतय म्हणून दिलीप ठाकूर यांनी मागे वळून बघतात तेवढ्यात आवाज देणारी व्यक्तीच खाली कोसळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला पकडले. या वेळी दिलीप ठाकूर यांनी त्यास आधार दिला नसता तर ती व्यक्ती रेल्वेच्या रुळाखाली आली असती.
शुद्ध हरपलेल्या मित्राला तिथेच जमिनीवर झोपवले. काय झाले हे पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. पण कोणीही मदतीला पुढे येत नव्हते, की त्या व्यक्तीला हात लावायला तयार नव्हते. काही जण म्हणत होते चक्कर आली असेल तर काहींनी दारु पिल्याची शंका व्यक्त केली. मात्र दिलीप ठाकूर यांनी कुणी डॉक्टर आहे का? असे जोरात ओरडून विचारले. सुदैवाने ठाकुर यांच्या ओळखीचे ‘सिडको नांदेड’ येथील डॉ. प्रमोद पाटील पुढे आले. त्यांनी दोन्ही हातांनी त्या व्यक्तीस पम्पिंग करण्यास सुरुवात केली. दिलीप ठाकूर यांनी मित्राच्या तोंडात तोंड घालून कृत्रीम श्वास दिला. जवळपास आठ मिनिटांच्या या प्रयोगानंतर शुद्ध हरवलेला मित्र हळूहळू शुद्धीवर आला. काय झाले याची त्याला कल्पना नव्हती. थोडी चक्कर आली असून आता बरे वाटत असल्याचे सांगून तो रेल्वेत बसतो, असे म्हणत ते गाडीत बसण्यास तयार झाले मात्र त्यांना अधिक तातडीने उपचाराची गरज असल्याचे उपस्थित डॉक्टने सल्ला दिला.
घटना तशी जुनीच-
ही घटना एक महिन्यापूर्वी घडली असली तरी घटनेची आत्तापर्यंत कुठेही चर्चा करण्यात आली नव्हती. बुधवारी (ता.२९) दिलीप ठाकूर यांची भेट झाली तेव्हा त्यांनी या प्रसंगाबद्दल माहिती दिली. औरंगाबाद येथील अखिल भारतीय कवीसंमेलनल अटोपून परत नांदेडला येण्यासाठी औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावर गाडीची वाट बघत असतानाची या सत्यघटने बद्दल माहिती दिली.
हेही वाचलेच पाहिजे- चीनहून आलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी काय आहे कारण? वाचा सविस्तर...
मित्राच्या रुपाने देवतूद धावून आला-
डॉ. पाटील यांनी हृदयविकाराचा झटका आला असून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दिलीप ठाकूर यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. आपला जाण्याचा बेत रद्द करून त्यांनी मित्राला एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तातडीने उपचार सुरू झाले. रात्रभर रूग्णालयात थांबून मित्राचे नातेवाईक आल्यानंतर दिलीप ठाकूर हे पहाटे देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला परतले. त्यांच्या मित्राची प्रकृती आता चांगली असून ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला. अतिशय कठीण प्रसंगी दिलीप ठाकूर यांच्या रूपात देवदूतानेच मित्राचे प्राण वाचविल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त करून दिलीप ठाकूर यांचे आभार मानले.
तत्काळ मदतीमुळे मिळाले जीवदान
मागील महिन्यात मी मराठवाडा एक्सप्रेसने नांदेडला येण्यासाठी रेल्वेस्थानकावर पोहचलो. गाडी स्थानकात आली होती. डब्याकडे जाताना मध्येच खूप गर्दी जमली होती. ॲम्बुलन्स म्हणून कुणीतरी ओरडत होते. मी गर्दीकडे वळलो. तेव्हा ओळखीचे दिलीप ठाकूर दिसले. मी गर्दीला बाजूला सारुन खाली झोपलेल्या त्या व्यक्तीच्या जवळ गेलो. हाताच्या नाडी तपासल्या पल्स शून्य असल्याचे लक्षात आले. तेव्हा हाताने त्याच्या ह्रदयाला चेतना (सीपीआर) देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे दिलीप ठाकूर यांनी कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. साधारणतः आठ मिनिटाने ते शुद्धीवर आले. उठून बसले पुन्हा ते नांदेडला निघण्यासाठी तयार झाले. परंतु मी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तेव्हा दिलीप ठाकूर यांनी ओळखीचा मित्र म्हणून गाडी सोडून देऊन त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातून मला फोन आला तेव्हा त्यांनी देखील या रुग्णास ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले व ह्रदयाला चेतना (सीपीआर) आणि कृत्रिम श्वास दिल्याने खरे जीवदान मिळाल्याचे सांगितले.
- डॉ. प्रमोद पाटील, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.