चीनहून आलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी काय आहे कारण? वाचा सविस्तर...

file photo
file photo

नांदेड : सध्या ‘कोरोना’ या विषाणूजन्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले असून, चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची देशातील विविध  विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच चीनहून परतलेल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांस सर्दीचा त्रास जाणवल्याने ‘कोरोना’ संशयीत रुग्ण म्हणून त्यास सोमवारी (ता.२७) रात्री उशीरा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालायातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

या विषयी नांदेडजवळील विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी ‘सकाळ’ला माहिती देताना सांगितले की, चीनमध्ये उद्भवलेल्या ‘कोरोना’ विषाणूच्या आजारामुळे खबरदारी म्हणून त्या रुग्णास सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत त्या विद्यार्थ्यांच्या घरातील अन्य एका सदस्यास सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला देखील रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली विशेष वार्डात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भीतीचे कारण नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. मस्के यांनी सांगितले.
 
आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी-  
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ‘कोरोना’ या विषाणूजन्य आजाराबद्दल मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारे मार्गदर्शक परीपत्रक जाहीर केले आहे. यात देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरु असून, प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्ण व त्यांच्या सहवासातील व्यक्ती यांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत (आयडीएसपी) करण्यात येणार असून, राष्ट्रीय विषाणू विज्ञान, पुणे येथील प्रयोग शाळेत आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. 

अशी आहे ‘करोना’ ची व्याख्या -
जागतिक आरोग्य संघटनेनी ‘कोरोना’ या विषाणुजन्य आजाराची व्याख्या तयार केली ती अशी आहे - साध्यासुध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स सारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एखादा विशिष्ट प्रकारच्या विषाणूगटास ‘‘कोरोना’ विषाणू असे म्हणतात. २००३ मध्ये आढळलेल्या (एसएआरएस) सार्स हा देखील एक प्रकारच्या ‘कोरोना’ विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेल्या विषाणू हा ‘कोरोना’ विषाणूच आहे. तथापी त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास (नाव्हेल) ‘कोरोना’ विषाणू असे नाव देण्यात आले आहे.  

उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील धोक्याचे संकेत -
‘कोरोना’ या विषाणूचा प्रचार नक्की कसा होतो. या बद्दलची निश्चित माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लक्षणे व स्वरुप पाहता खोकणे, शिंकणे याद्वारे हवेमार्फत (ड्रॉपलेट) या विषाणूचा प्रसार होत असावा असा सर्वसाधारण अंदाज बांधला जात आहे. शिवाय या विषाणूसाठी सध्यातरी कुठलीही लस अथवा औषध उपलब्ध नाही. हा आजार प्राणीजन्य असला तरी, हा नवीन विषाणू नेमक्या कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो या बद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद्या ‘कोरोना’ रुग्णावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची भीती आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत व्यक्त केली. आरोग्य कर्मचारी यांनी सुयोग्य संसर्ग प्रतिबंधक व नियंत्रण पद्धतीने आवश्यक ते उपचार करावेत, अशा आरोग्य विभागास सूचना केल्या आहेत. 

रुग्ण स्तरावर अशी काळजी घेणे आवश्यक-
हात धुण्याची व्यवस्था, पी.पी.ई.ची पुरेशी व्यवस्था, जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, रुग्णालयातील तयारी आणि विलगीकरण कक्ष सुसज्ज असणे आवश्यक आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटर तसेच जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत रहावी, याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

अशी आहेत सर्वसाधारण लक्षणे- 
सर्दी - खोकला, गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे, श्वास घ्यायला त्रास होणे, श्वास घेताना अडथळा येणे, न्युमोनिया, पचनसंस्थेची लक्षणे, मुत्रपिंड निकामी होणे, प्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तीमध्ये सामान्यता या आजाराची लक्षणे आढळून येतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com