आणि ती पुन्हा नव्या दमाने आश्रमशाळेत परतली...वाचा सविस्तर

शिवचरण वावळे
Thursday, 5 March 2020

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे नाव जरी ऐकले तरी, अख्खे कुटुंब हैराण होते. खचुन जाते. कर्करोग आजार आपल्या आयुष्याचा शेवटच करणार, असे एक ना अनेक प्रश्न रुग्णासहित कुटुंबियांच्या मनात उठतात. परंतू , १३ वर्षाची वर्षा खरोडे या आदिवासी विद्यार्थिनीने या दुर्धरआजारावर उपचाराअंती यशस्वीरित्या मात केली आहे.


 

नांदेड : किनवट, जलधारा, बोधडी हा पट्टा मागास आणि दुर्गम भाग. तेथे शिक्षणाची पुरेशी साधणे उपलब्ध नाहीत. नाविलाजाने या भागातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच आदिवसी आश्रमशाळेत राहुन शिक्षण घ्यावे लागते. वर्षा खरोडे ही बोधडीच्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकते. वर्षाला काही कळण्याअधिच तिला कर्करोगाने जखडल्याचे निदान झाल्याने, खरोडे परिवार चिंताग्रस्त झाले होते. मात्र, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मां यांनी पुढाकार घेत वर्षाच्या आई वडीलांची समज काढली. वर्षावर मुंबईत उपचार सुरु झाले. वर्षभराच्या यशस्वी उपचारानंतर गुरुवारी (ता.पाच मार्च २०२०) ती मोठ्या विश्वासाने आश्रम शाळेत परतली.

असे झाले निदान
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी वर्षाची कथा. वर्षा खरोडेला दीड वर्षांपूर्वी खेळत असताना पोटात असह्य वेदना होत होत्या. याच दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरु असताना वर्षाला चक्कर आणि काही कळायच्या आतच ती कोसळली होती. घटनेनंतर वर्षाची किनवट येथे प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर तीला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ‘एमआरआय’ चाचणी केली. त्यावेळी वर्षाच्या हृदयाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या वाहिनीमध्ये कर्करोगाची गाठ असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी नांदेड येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षाला उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा-  नांदेडला ‘हास्यवती’ अनोख्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन कसे असणार ते वाचा सविस्तर

तब्बल वर्षभर उपचार
मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर ‘बायोप्सी’ करण्यात आली. यात वर्षाला कर्करोग असल्याचे स्पष्ट निदान झाले. कर्करोगावर मात करण्यासाठी मुंबईत राहुन उपचार घ्यावे लागणार होते. शिवाय गडगंज पैसे आणायचे कुठुन? वर्षभर मुंबईत राहायचे कुठे? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या आई-वडिलांसमोर उपस्थित झाले. परंतु, म्हणता ना की, ‘देव तारी त्याला कोण मारी’. आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या वर्षाच्या मदतीला धावून आल्या. आई-वडिलांची समज काढून त्यांना मोठा धीर दिला. तिच्या आई वडिलांना ‘कॉटनग्रीन’ येथील सेंट ज्यूड चाईल्ड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले. वर्षावर ‘टाटा मेमोरियल’ रुग्णालयात भरती करून तेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून वर्षभर उपचार केले. या दरम्यान वर्षाला तब्बल १६ ‘किमो’ आणि ३० ‘रेडिओ’ थेरपी उपचार केले.

हेही वाचलेच पाहिजे​​- पराभवाने झालेली वेदना असते यशासाठी प्रेरकच, कशी ते वाचाच

या योजनेतून होतात मोफत उपचार
आश्रम शाळेत राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध आरोग्य योजनेतून लाभ दिला जातो. परंतू, या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यातही प्रशासन कमी पडत असल्याने अनेक पालकांना या आरोग्यसेवेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसते. ‘आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी’ आणि ‘डिजी हेल्थ प्रणाली’ या उपक्रमाद्वारे तिच्यावर उपचार करण्यात आले.

 

नियमित आरोग्य तपासणी होते
आश्रमशाळेत होणाऱ्या नियमित आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थ्यांमधील आजाराचे लवकर निदान होते. विद्यार्थी दीर्घकाळ आश्रमशाळेत राहतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असते. आदिवासी विद्यार्थी हे निरोगी आणि दीर्घायुषी राहावेत यासाठी आदिवासी विकास विभाग कायम प्रयत्नशील आहे.
- मनीषा वर्मा (प्रधान सचिव-आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And She Went Back To The Ashram School For A Fresh Start Read More Nanded News