नांदेडला ‘हास्यवती’ अनोख्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन कसे असणार ते वाचा सविस्तर

शिवचरण वावळे
Thursday, 5 March 2020

आवडीचा छंद असेल तर तो जोपासण्यासाठी तो फायदा आणि तोटा याचा विचार करत बसत नाही. त्याचबरोबर कशाचीच अपेक्षा करत नाही. छंद जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यातून निखळ आनंदच मिळतो. ज्येष्ठ साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर हे छंदात आनंद शोधणारे व्यक्तीमत्व आहे. 

नांदेड : एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीचा छंद असेल तर तो जोपासण्यासाठी तो फायदा आणि तोटा याचा विचार करत बसत नाही. त्याचबरोबर कशाचीच अपेक्षा करत नाही. छंद जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यातून निखळ आनंदच मिळतो. परंतु असा आनंद सर्वांनाच मिळवता येतोच असे नव्हे. ज्येष्ठ साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर हे छंदात आनंद शोधणारे व्यक्तीमत्व असून त्यांनी व्यंगचित्र अभ्यासक म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. 

नांदेडमधील व्यंगचित्र अभ्यासक आणि लेखक मधुकर धर्मापुरीकर हे नेहमीच वेगळ्या विषयाची मांडणी करत आले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी ता. आठ मार्चला श्री धर्मापुरीकर यांनी ‘हास्यवती’ या शिर्षकाखाली नांदेडात शहरात ‘स्त्री स्वभावाचा गौरव’ करणारे जागतिक कीर्तीचे व भारतीय व्यंगचित्रकारांची विविध व्यंगचित्रे एकत्रीत करुन अनोखे प्रदर्शन  आयोजित केले आहे. 

व्यंगचित्रकलेविषयी जाण विकसीत होत नाही

विशेष म्हणजे स्त्री स्वभावाचा गौरव करणारी जागतिक कीर्तीची, तसेच भारतीय व्यंगचित्रकारांची विविध व्यंगचित्रे या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य वाचकांना सहसा राजकीय व्यंगचित्रे पहाण्यात येतात, किंवा साधारण व्यंगचित्रे पहाण्यात येतात. दर्जेदार व्यंगचित्रे उपलब्ध होत नसल्याने व्यंगचित्रकलेविषयी जाण विकसीत होत नाही. या प्रदर्शनाच्या निमित्ताने उत्तम दर्जेदार व्यंगचित्रे रसिकांना पहायला मिळतील, शिवाय महिला विषयक म्हणी, कोटेशन्सचा आस्वादसुध्दा घेता येणार आहे.

हेही वाचा-हिंगोलीत व्यापाऱ्यांनी मागितले इच्‍छा दया मरण

व्यंगचित्र रसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
रविवारी (ता. आठ) सकाळी साडेनऊ वाजता या प्रदर्शनाचे डॉ. वैशाली गोस्वामी, डॉ. अनुराधा जोशी-पत्की, स्नेहलता स्वामी आणि डॉ. भाग्यश्री इनामदार यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन होणार आहे. शिवाय व्यंगचित्रकार बाबू गंजेवार हे देखील यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजीनगर येथील नाना नानी पार्कसमोर असलेल्या हॉटेल विसावा पॅलेस येथे हे प्रदर्शन आयोजित केले असून रसिकांसाठी ते दिवसभर खुले असणार आहे. तरी व्यंगचित्र रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 हेही वाचा- ...अन् त्याने केला मैत्रीचा विश्वासघात !

व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचा प्रकल्प 
हे प्रदर्शन समाजसेविका आणि ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या संपादिका विद्याताई बाळ यांना समर्पित करण्यात आले आहे. एकाच विषयावरची विविध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे घेऊन प्रदर्शन भरविणे हे धर्मापुरीकरांच्या छंदाचे वैशिष्‍ट्य. यापूर्वी त्यांनी, ‘व्यंगमंच’, ‘हास्यउपचार’, ‘डिलाइट इन मॅडनेस’, ‘महात्मा: शब्दांतून..रेषेतून’ अशी प्रदर्शने घेतली आहेत. आता पोलीस आणि जनता या नात्यावरच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचा त्यांचा प्रकल्प आहे.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read More About How Nanded Will Have An Exhibition Of Hhumorous' Unique Cartoons Nanded News