कोरोनाच्या खबरदारीसाठी अंगणवाडी केंद्र बंद - कोणते ते वाचा 

file photo
file photo

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह चित्रपटगृह, स्विमींगपुल, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी यात्रा, पारंपारीक उत्सव, लग्न समारंभ, सभांवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. शहरी भागातील अंगणवाडी केंद्रही बंद ठेवण्यात आले असून ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्यासह आरोग्य सेविका घरभेटीद्वारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करत आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांसह गर्दी टाळण्यासाठी पारंपारिक उत्सव, लग्न समारंभांना निर्बंध जारी करत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शनिवारी (ता. १४) बैठकीद्वारे पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक सुचना जारी केल्या. यामध्ये शहरी भागातील अंगणवाडी केंद्र बंद ठेवून नागरीकांमध्ये जनजागृतीचे आदेश देण्यात आले आहेत.

 कोरोनाच्या धास्तीने शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना खाऊपासून मुकावे लागणार आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र सुरू असले तरी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर गावपातळीवर घर भेटीद्वारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करत आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रभावीत रुग्ण नसला तरी समस्या निर्माण होण्यापूर्वीच यंत्रणेकडून खबरदारीवर भर देण्यात येत आहे. 

खाऊ वाटपानंतर मर्यादित वेळेत घरी -
जिल्ह्यातील तीन हजार सातशे अंगणवाडी केंद्रापैकी महापालिका, नगरपंचायत, नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने अंगणवाडी केंद्र मदतनीस, सेविकांसमवेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरभेटीच्या कर्तव्यावर आहेत. ग्रामीण भागातील सुरु असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना मास्क सोबत हात धुण्यास सातत्याने प्रवृत्त करण्यात येत आहे. दरम्यान, अंगणवाडी केंद्रातील पूर्वीच्या बैठक व्यवस्थेत बदल करुन किमान अंतरावर बालकांना बसविण्यात येत असून खाऊ वाटपानंतर मर्यादित वेळेत घरी पाठविण्यात येत आहे. 

प्रथमोपचारसाठी विशेष कक्ष-
ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आले नसले तरी कोरोनाच्या धास्तीने प्रथम सत्रामध्येच चिमुकल्यांना खाऊ वाटप करुन घरी काळजीपूर्वक पाठवण्यात येत आहे. बालकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला असून सर्दी, खोकला असलेल्या बालकांची तत्काळ आरोग्य तपासणी करुन अंगणवाडी केंद्रातच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रथमोपचार केला जात आहे. आवश्यकतेनुसार बालकांना रुग्णालयात वर्ग करण्यात येते. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर प्रथमोपचारसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

यंत्रणेने कंबर कसली-

या शिवाय प्राथमिक आरोग्यस्तरावर आरोग्य कल्याण समितीकडून उपचारार्थ दक्षता घेण्यात येत असून वैद्यकिय अधिकारी, निवासी वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना तत्परतेच्या सुचना जारी करण्यात आल्याने गावपातळीवर अंगणवाडी केंद्रापासून शाळा, महाविद्यालयापासून ते शासकीय कार्यालयापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com