कोरोना सावट : सामाजिक बांधिलकी जोपासत विवाह स्थगीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

दोन्ही परिवाराने घेतली जिल्हाधिकारऱ्यांची भेट; आमदार अमर राजुरकर यांची मध्यस्थी

नांदेड : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूपासून गंभीर असा संसर्गजन्य आजार होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक कार्यक्रम व विवाह सोहळा ता. ३१ मार्चपर्यंत आयोजित न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयास प्रतिसाद देत नांदेड येथील प्रतिष्ठित परिवार असलेल्या शंकपाळे- मुदिराज यांनी त्यांच्या परिवारातील विवाह सोहळा स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आमदार अमर राजूरकर यांची मध्यस्थी 

सामाजिक बांधिलकी समजून विवाह पुढे ढकलण्याचा या परिवाराच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा विवाह स्थगीत करावा यासाठी आमदार अमर राजूरकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही परिवाराच्या प्रमुख सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवला.

हेही वाचाकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधित आदेश - कुठे ते वाचा

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान

येथील अभियंता माधवराव शंकपाळे यांची कन्या मधुलीका हिचा विवाह डॉ. सुरेश मुदिराज यांचे चिरंजीव आशिष यांच्या समवेत ता. १९ मार्च रोजी उस्माननगर रोडवरील गुंडेगावकर मंगल कार्यालयात आयोजीत केला होता. या विवाह सोहळ्याची दोन्ही परिवाराकडून जय्यत तयारी सुरू होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने चांगलाच हैदोस घातला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३३ कोरोना रूग्ण सापडले आहेत. कोरोनाचा झपाट्याने होणारा विस्तार व या विषाणूच्या विळख्यात सापडलेला समाज यांना सावरण्यासाठी व हे संकट दुर करण्यासाठी राज्यसरकारने शाळा महाविद्यालये, सिनेमागृहे, मॉल, स्विमींगपूल आदी सार्वजनिक ठिकाणांना ता. ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच विवाह सोहळा व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकण्याची विनंती केली होती. 

शंकपाळे- मुदिराज परिवाराने विवाह पुढे ढकलला

सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन शंकपाळे- मुदिराज परिवाराने विवाह पुढे ढकलण्याची आपली भूमिका आमदार अमर राजुरकर यांच्या पुढे मांडली. एका क्षणाचा विलंब न करता आमदार राजुरकर यांनी शंकपाळे- मुदिराज परिवारांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत भेट घालून दिली. आमदार अमर राजूरकर या दोन्ही परिवारातील प्रमुख व्यक्तींसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. 

येथे क्लिक कराPhotos : आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त नातवाने घेतली स्पर्धा परीक्षा

शिष्टमंडळात यांचा होता समावेश 

यावेळी आमदार अमर राजूरकर, विजय येवनकर, इंजि. माधवराव शंकपाळे, डॉ. सुरेश मुदिराज, उपवर इंजि. आशिष मुदिराज, नगरसेवक प्रशांत तिडके, प्रताप कदम, गुंडेगावकर मंगल कार्यालयाचे प्रमुख प्रकाश गुंडेगावकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शंकपाळे- मुदिराज परिवारानी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतांनाच हा एक सामाजिक बांधिलकीचा निर्णय असल्याचे सांगीतले. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर हा विवाह सोहळा पुढील काही दिवसात संपन्न होणार आहे. या दोन्ही परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona viral: Marriage deferred in pursuit of social commitment nanded news