कर्जमुक्तीची घोषणा तत्काळ करा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

बीड जिल्ह्यातील माजलगावात ऍड. रामराव नाटकर स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. राज्यातील महाराष्ट्र आघाडी सरकारने तत्काळ कर्जमुक्तीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. शेट्टी यांनी केली आहे.

माजलगाव (जि. बीड) - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी धोरणाचा पुरस्कार करणारे असून, त्यांनी अनेक विरोधी करार केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने या सरकारच्या धोरणांचा पाडाव करणे गरजेचे आहे. राज्यातील महाराष्ट्र आघाडी सरकारने तत्काळ कर्जमुक्तीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

ऍड. रामराव नाटकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (ता. 16) आयोजित ऍड. रामराव नाटकर बळिराजा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश काळे, माजी आमदार मोहनराव सोळंके, राजेंद्र जगताप, अमित नाटकर, ऍड. गोले, संदीप जगताप, मोहन गुंड, पूजा मोरे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

यावेळी शेतकरी नेते इक्‍बाल पेंटर, डॉ. उद्धव घोडके यांना ऍड. रामराव नाटकर यांना बळिराजा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. शेट्टी म्हणाले, की ऍड. रामराव नाटकर यांनी चार दशकांत जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी चळवळ जिवंत ठेवून आयुष्यभर केलेला संघर्ष तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

येत्या आठ जानेवारी 2020 ला प्रादेशिक व्यापक भागीदारी करार रद्द करून शेतमालाला दीडपट हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात ग्रामीण भारत बंदची देशव्यापी हाक दिली असून, या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. शेट्टी यांनी केले. यासाठी कुलदीप करपे, धम्मानंद साळवे, अमित नाटकर, रामप्रसाद काळे, रामचंद्र डोईजड आदींनी पुढाकार घेतला. 

सोळंकेंकडून एक लाखाचा धनादेश 
माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी संघटनेला मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश खासदार राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announce immediate debt relief - Raju Shetty