बीडच्या कोविड लॅबला तत्त्वत: मंजुरी, स्वारातीच्या रिक्त जागा भरणार - अमित देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या २६० खाटांच्या इमारतीसही तत्त्वत: मंजुरी देत आहे. इतर मागण्याही मंजूर करून येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी येथे दिली. 

अंबाजोगाई (जि. बीड) - राज्यात कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा फक्त दोनच कोविड लॅब होत्या, परंतु चाचण्या लवकर होण्यासाठी राज्यात १०८ लॅब सुरू केल्या. बीडलाही कोविड लॅब सुरू करण्यासाठी लगेच तत्त्वत: मंजुरी देत आहे. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवावा. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या २६० खाटांच्या इमारतीसही तत्त्वत: मंजुरी देत आहे. इतर मागण्याही मंजूर करून येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (ता.२६) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी येथील पालिकेच्या सभागृहात कोविड-१९ ची जिल्हा आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नगराध्यक्षा रचना मोदी, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांची उपस्थिती होती. 

बीडचे कौतुक 
बीडच्या सर्व कोरोना योद्ध्यांनी परिश्रम घेत जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्याला जनतेनेही साथ दिली, याचे कौतुक श्री. देशमुख यांनी करून जिल्हाधिकारी यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेही कौतुक केले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कोविड लॅब सुरू झाली. त्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळला. चाचणी केल्याशिवाय कोविड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कळत नाही. अशीच लॅब बीडलाही सुरू करू, जेणेकरून चाचण्या लवकरात लवकर होतील. या लॅबसाठी तत्त्वत: मंजुरी देत असून, जिल्हाधिकारी यांनी हा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी केल्या. 

राज्यात २५ हजार पदांची भरती 
वैद्यकीय क्षेत्रात रिक्त जागांचा मोठा अनुशेष आहे. तो भरण्यासाठी राज्यात २५ हजार पदांची भरती राज्य सरकार करणार आहे. आरोग्य केंद्रात व रुग्णवाहिकेत आॅक्सिजन सिलिंडर असणे आवश्यक आहे. अत्यावश्यक रुग्णांसाठी ते गरजेचे आहे. त्याची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा उपक्रम राबविला जात आहे. अत्यावश्यक रुग्णांसाठी ते आवश्यक आहे. पुढच्या आठवड्यातच त्याचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

स्वारातीच्या मागण्या 
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी केलेल्या मागण्यांवर बोलताना, श्री. देशमुख म्हणाले की, या रुग्णालयात ७५० बेडची आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन २६० खाटांच्या इमारतीस मंजुरी मिळावी या मुख्य मागणीसह वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचारीसंख्या वाढवावी या मागण्यांना तत्त्वत: मंजुरी त्यांनी दिली. 
यावेळी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या व तक्रारी पत्रकारांनी मांडल्या. त्याविषयी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून अहवाल द्यावा, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval of Beed's Covid Lab