हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१.७० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

file photo
file photo
Updated on

हिंगोली :  जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन २०२१- २२ या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी २२४ कोटी सात लाख ७३ हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने प्रत्यक्ष १७१ कोटी ७० लाख ५१ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार सर्वश्री राजीव सातव, हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी २५ कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या वीजबिलासाठी ७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असून या कामी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने कामे करुन घेण्याच्या सूचना  पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

समिती सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे देयक भरुनही वीज पुरवठा सुरु होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री यानी या प्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून सदर वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत व ते वेळेवर दुरुस्त करुन मिळत नसल्याच्या तसेच वीज देयकाअभावी वीज पुरवठा खंडित करण्याच्या  महावितरणच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची तक्रारी समिती सदस्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीसोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सदर प्रश्न तात्काळ मार्गी काढावेत. हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे काम तात्काळ पूर्ण करुन ते खुले करावे, अशा सूचना श्रीमती गायकवाड यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहीका खरेदी करण्यात यावी. तसेच नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, अशाही सूचना पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाझर तलाव, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) कामे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा डीपीआर तयार करुन सादर करणे, अनुसूचित जाती, जमाती समाजातील लोकांना विहिरीसाठी वीज जोडणी देणे, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. यावेळी तसेच सन २०२०-२१ आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. तसेच सर्व संबंधीत विभागांनी सन २०२०-२१ अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना व मागण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने त्याचे निरसन करावे व केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित सदस्यांना वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

सन २०२१-२२ अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता १०१ कोटी ६८ लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता ५१ कोटी ९० लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत १८ कोटी १२ लाख ५१ हजार अशा एकुण १७१ कोटी ७० लाख ५१ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत १५ जानेवारी २०२१अखेर झालेल्या खर्चाचा देखील आढावा यावेळी श्रीमती गायकवाड यांनी  घेतला .  

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सन २०२०-२१चा प्रारुप आराखडा मान्यतेसाठी समितीसमोर सादर केला. तसेच खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच सन २०२०-२२ साठी  प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव प्राप्त झाले असून लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करुन शंभर टक्के खर्च करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही अनुसूचित जमाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला. यावेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.
Marathi News Esakal
www.esakal.com