मक्‍यानंतर बाजरीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यातच प्रथम लष्करी अळीने मका पिकानंतर बाजरीला लक्ष्य बनवून त्यावर आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. एकंदरीत लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मक्‍यापाठोपाठ तोंडाशी आलेल्या बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र पाचोड (ता. पैठण) परिसरात पाहावयास मिळत आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यातच प्रथम लष्करी अळीने मका पिकानंतर बाजरीला लक्ष्य बनवून त्यावर आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. एकंदरीत लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मक्‍यापाठोपाठ तोंडाशी आलेल्या बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र पाचोड (ता. पैठण) परिसरात पाहावयास मिळत आहे.

वेळेवर हुलकावणी व अपुऱ्या पावसामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणून यंदा सिल्लोडची मक्तेदारी मोडीत काढून पैठण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दहा मंडळांत मक्‍याची जुलै अखेर एक हजार 525 हेक्‍टरवर, तर चार हजार 614 हेक्‍टर क्षेत्रावर बाजरीची पेर साधली अन्‌ पावसाने घेतलेली दीर्घ विश्रांती व मक्‍यावरील अळीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रथमच यंदा या पिकावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने मक्‍याला अळीपासून वाचविण्यासाठी त्यांनी महागडी कीटकनाशके वापरली. मात्र, लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मक्‍याची पूर्णतः चाळणी झाली. त्यापाठोपाठ आता लष्करी अळीने बाजरीच्या पिकास "लक्ष्य' बनविले असून मक्‍यानंतर बाजरीचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना जिकिरीचे बनले आहे.

या लष्करी अळीने सर्वत्र थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजरीवर नांगर फिरविण्याचे संकट ओढावले आहे. ही अळी शेंडा, पानानंतर पोंगा खाऊन पिकांची वाढ थांबवत आहे. पाने व पोंगा कुरतडून टाकणाऱ्या या अळीमुळे उत्पादनच संकटात सापडले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन अद्यापही मका व बाजरीची पाहणी केलेली नाही. सदरील विभागाचे अधिकारी-कर्मचारी मुख्यालय सोडून अन्य ठिकाणी वेळ मारून नेत आहेत. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळाधिकारी व तालुका कृषी अधिकारी माहीत नसून शेतकरी कृषी योजनांपासून अनभिज्ञ आहेत. आता तरी कृषी विभागाने गावनिहाय बांधावर येऊन मार्गदर्शन करावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. निंबोळी अर्क पाच टक्के, निमयुक्त कीटकनाशकाची फवारणी करावी. शेतात पक्षी थांबे निर्माण करावे. पिकांत पक्षी थांबे बसवावेत, बाजरीच्या पोंग्यात राख मिश्रित घेसू वाळू किंवा कार्बोफिरॉनचा वापर करावा. पोंग्यात पाणी गेल्यास अळी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. पोंग्यात किंवा मक्‍याच्या पानांवर विष्टा आढळून आल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षण समजावे.
- विनोद अंभोरे, कृषी पर्यवेक्षक, पाचोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Warm On Millet