अशोक चव्हाण, अमर राजूरकरांनी दिला पन्नास लाखाचा निधी

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 31 मार्च 2020

नांदेड वाघाळा महापालिकेच्या कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आणि आमदार अमर राजूरकर यांनी प्रत्येकी पन्नास लाखाचा निधी दिला आहे. 

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत भोकर मतदारसंघातील उद्‍भवलेल्या कोरोना विषाणूच्या संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. 

नांदेडचे विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी पन्नास लाखाचा निधी दिला आहे. तसेच नांदेड वाघाळा महापालिकेच्या कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला.

हे ही वाचा - Video - नांदेडकर अजूनही अनभिज्ञच...कशाबाबत ते वाचाच....

वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी निधी
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२० - २१ अंतर्गत कोरोनामुळे झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्यासाठी श्री. चव्हाण यांना पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सदरील निधी भोकर विधानसभा मतदारसंघातील उद्‍भवलेल्या कोरोना संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची शिफारस केली आहे. याबाबतीतील एक पत्र श्री. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सादर केले आहे.

आमदार राजूरकरांनी दिले ५० लाख
नांदेडचे विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची शिफारस केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्‍भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून देण्यात आला आहे. या निधीतून नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी समान स्वरुपात वाटप करण्यात यावा तसेच कोरोनाच्या विषाणुमुळे उद्‍भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना करावयाच्या असतील त्यासाठी लागणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात यावे व तशी माहिती कळवावी, असेही आमदार राजूरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - बॅंकेत गर्दी टाळण्यासाठी करावा ग्राहक सेवा केंद्राचा वापर

नगरसेवकांनी दिले एक महिन्याचे मानधन
दरम्यान, नांदेड वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे सात लाख १६ हजार ६६६ रुपयांच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी आमदार अमर राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan, Amar Rajurkar funded fifty lakhs, Nanded news