Video - नांदेडात अशोक चव्हाणच ठरले भारी

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नांदेडला कॉँग्रेसने वर्चस्व राखले असून नांदेड जिल्ह्यात पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागा कॉँग्रेसने पटकाविल्या आहेत. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे अब्दुल गफ्फार विजयी झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

नांदेड - जिल्ह्यात पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा भारी ठरले असून पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागा कॉँग्रेसने जिंकल्या आहेत. एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. महापालिकेतही कॉँग्रेसने बाजी मारली असून माजी महापौर अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल गफ्फार यांनी विजय मिळवला आहे. 

नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ (चौफाळा - मदिनानगर) या प्रभागाची पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. सहा) दहा हजार ६६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५२.१० टक्के मतदान झाले. शुक्रवारी (ता. सात) मतमोजणी झाली. त्यात कॉँग्रेसचे अब्दुल गफ्फार यांनी विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे साबेर चाऊस यांचा पराभव केला. 

हे ही वाचा - तीन दिवशीय ‘कृषीवेद’ जागर कृषी समृद्धीचा, कुठे ते वाचा

कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
निवडून आल्यानंतर अब्दुल गफ्फार यांना निवडणुक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी पत्र दिले. त्यानंतर कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार अब्दुल गफ्फार जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुक काढण्यात आली. प्रभाग क्रमांक १३ मध्ये चौफाळा, मदिनानगर भागातही जल्लोष साजरा करण्यात आला आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अब्दुल गफ्फार यांचे स्वागत केले. 

‘एमआयएम’चे स्वप्न भंगले
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघातून एमआयएम पक्षाकडून साबेर चाऊस यांनी निवडणुक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. साबेर चाऊस हे कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक होते. तसेच यापूर्वी देखील ते नगरसेवक व प्रभाग समिती सभापती होते. मात्र, त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन एमआयएममध्ये प्रवेश करुन विधानसभेची निवडणुक लढविली होती. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा त्यांचा दावा होता. मात्र, त्यांचे आणि एमआयएमचे स्वप्न भंगले. २०१० च्या पोटनिवडणुकीत एमआयएम विजयी झाली होती त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये एमआयएमला एकही जागा मिळाली नाही. 

हेही वाचलेच पाहिजे  - आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार...काय ते वाचलेच पाहिजे

प्रभाग १३ ‘ड’ - उमेदवारांना मिळालेली मते

  1. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार (कॉँग्रेस) - सहा हजार २५ (विजयी)
  2.  मोहमंद साबेर चाऊस (एमआयएम) - चार हजार १५९ 
  3. जफरअलीखान पठाण (इंडियन डेमोक्रेटिक मुव्हमेंट) - ६०
  4. अमर लाला (अपक्ष) - ८७
  5. मजहर (अपक्ष) - २५
  6. अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) - सहा
  7. वरीलपैकी एकही नाही (नोटा) - २९९ 

जनतेचा विश्‍वास सार्थ ठरविणार 
कॉँग्रेस पक्ष आणि नेते अशोक चव्हाण यांनी माझ्यावर विश्‍वास ठेऊन मला उमेदवारी दिली तसेच पदाधिकारी आणि जनतेने साथ दिल्याने मी विजयी झालो. त्यामुळे श्री. चव्हाण यांच्यासह आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डेसह सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यासोबतच विकासकामे करण्यावर आपला भर राहणार आहे. माजी महापौरांचा पुत्र असलो तरी युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून आपण कार्यरत असून जनतेने आपल्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवणार आहोत. 
- अब्दुल गफ्फार, नूतन नगरसेवक, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan became the heaviest in Nanded