अशोक चव्हाण कोणाला म्हणाले... मेरे सपनो की रानी कब आयेगी तू.....

शिवचरण वावळे
Friday, 14 February 2020

मेरे सपनों की रानी कब आयेगी तू.....त्याचबरोबर जिंदगी कैसी है पहेली हाये......तसेच आखियों के झरोके से....हे गाण असलेला चित्रपट तब्बल दहा वेळा पाहिलेल्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा उलगडा करत दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन जिवनातील किस्से आणि प्रेम, राजकारणातील यशापयश, सध्याची राजकीय परिस्थिती, कौटुंबिय संबंध, आवडी निवडी अशा विविध पैलुवर मनसोक्त गप्पा मारल्या. तर मध्येच तुमचे प्रेम कसे झाले म्हणत रितेश देशमुख यांनाही बोलते केले.  

नांदेड :  वडील मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले त्याचबरोबर स्वतः युवक काँग्रेसपासून सुरुवात करुन नंतर आमदार, खासदार तसेच विविध खात्यांचे मंत्री ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी जीवनातील अनेक रहस्य उलगडले. सामाजिक, राजकीय जीवनातील अनेक सुख - दुखाःचे क्षण श्री. चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी उपस्थित नांदेडकरांनी सांगितले. सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचबरोबर ‘व्हॅलेनटाईन डे’ निमित्त शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी यशवंत महाविद्यालयाच्या प्रागंणात हा योग जुळून आला. ‘आनंदाचे डोही’ या मुलाखतीतून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू, पट उघडले गेले. यावेळी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

वडील नाना म्हणजेच शंकरराव चव्हाण यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले परंतु स्वतःसाठी मुंबईत घर घ्यावे, असे त्यांनी कधीच वाटले नव्हते. अचानक इंदिरा गांधीचे सरकार कोसळले आणि देशात आणीबाणी लागली. नानांनी राजीनामा दिला होता. तेव्हा मुंबईत रहायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आमदार निवासात दोन खोल्यात सर्व कुटुंब राहिले. त्यातून खूप काही शिकता आले. तो माझ्या जीवनाला कलाटणी देणारा काळ ठरला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा- व्हॅलेंटाईन डेलाच का भेटले राणा जगजीतसिंह आणि तानाजी सावंत

नाना नेहमी राजकारणात अग्रस्थानी होते. म्हणून माझ्याकडे देखील त्यांचे काही गुण होते. मी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडणुक लढलो. त्यात अभाविपच्या उमेदवाराला हरवून मी विजय झालो. सर्वात जास्त मुलींनी मला मते दिली होती. त्यानंतर महाविद्यालयात महिला प्रतिनिधी म्हणून अमिताला उभे केले निवडून आणले. ती आजही राजकारणात कायम आहे. वडिलांचा स्वभाव शिस्तीचा होता. घड्याळाच्या वेळेवर ते चालत होते. त्यांच्या निवडणुकीची मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामे पाहिली. त्यामुळे वडिलांनी उभे केलेले सामान्य ते असामान्य जनतेचे नेटवर्क चाळीस वर्षानंतर देखील आजही माझ्या पाठीशी उभे आहे. वडिलांनी उभ्या आयुष्यात सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले. तेच माझे राजकारणातील आयडॉल आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलेच पाहिजे- ‘ते’ ३५ वर्षांनी भेटले आणि वाचा त्यांनी काय केले

महाराष्ट्राला घडविण्यात अनेक दिग्गज नेते आहेत. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यात व्यक्तीगत वाद कधीच नव्हते. मराठवाड्याचा विकास आणि निधीवरुन वाद होते. शरद पवार राजकारणातले हिरो आहेत. त्यांच्याकडे बघून आजही तरुणाईला प्रेरणा मिळते. अजित पवार आणि माझे चांगले जमते. विकासाच्या प्रश्नावर वाद होतो. त्याला वाद म्हणत नाहीत. विलासराव देशमुख यांना मी मोठा भाऊ मानतो. कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध आहेत. हे कुटुंब आजही कायम आहे. शेवटी स्वतःला स्वतःच सिद्ध करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वक्तशीर, प्रामाणिक आणि निर्भिडपणा हा नानांचा स्वाभाव होता. त्यांची हीच भूमिका घेऊन मी पुढे जात आहे. राज्याचा सावर्जनिक बांधकाम मंत्री म्हणून मला सुद्धा तेलंगणा आणि आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील रस्ते गुळगुळीत व्हावेत, असे प्रामाणिक पणे वाटते. पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील रस्ते चांगले करण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan Said to Whome ... When Will You Come To My Dream Nanded news