नांदेडचा अशोक अडकला दुबईत...

islapur.jpg
islapur.jpg


इस्लापूर, (ता. किनवट, जि. नांदेड)ः आप्पारावपेठ (ता. किनवट) येथील तरुण अशोक आशेन्ना गोरा (वय २९) हा पोटाची खळगी भरण्यासाठी सहा वर्षांपूर्वी विदेशात दुबईला गेला होता. तुझा पासपोर्ट हरवल्याचा बहणा करून, तेथील कंपनीधारक या तरुणाचा छळ करत असल्याने विदेशात असलेला तरुण मायदेशी परतण्यासाठी धडपड करत आहे. फेसबुकवर आमदार भीमराव केराम यांचा फोटो पाहून त्याला धीर आल्याने त्याने गावातीलच एकाशी संपर्क केला अन् सर्व बिंग फुटले असून विदेशात असलेल्या मुलाला मायदेशी परत आणण्यासाठी त्या तरुणाच्या आई - वडिलांनी आमदार भीमराव केराम यांना साकडे घातले आहे.

कंपनीधारकाकडून मानसिक त्रास
तेलगंणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या, किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथील फुलेनगरमधील रहिवासी अशोक आशन्ना गोरा या तरुणाच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तो कामाच्या शोधात होता. त्यातच त्याला विदेशात जाऊन पैसे कमावण्याचा सल्ला एकाकडून मिळाला. व्याजाने पैसे काढून व्यवसाय करणाऱ्या एका एजंटच्या मदतीने तीन वर्षांच्या कराराने २०१३ ला दुबई येथे तो गेला. दुबईत गेल्यानंतर त्यास ‘अजमान ईंड्रस्ट्रीयल कंपनी’मध्ये त्याला काम मिळाले. पण गेल्या तीन वर्षांपासून कंपनीधारकाकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने मायदेशी परत जाण्यासाठी सदर तरुणाने कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याकडे पासपोर्टची मागणी केली असता, तुझा पासपोर्ट हरवला आहे, तुला मायदेशी परत जाता येणार नाही, असा दम देण्यात आल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. पण आई-वडील अशिक्षित व तेलगू भाषिक असल्याने कोणाकडे दाद मागावी? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

मायदेशी परत जाण्यासाठी चिंतेत असलेला अशोक एक दिवस फेसबुक पाहत असताना किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांचा फोटो पाहून त्याच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता फोन करून आपल्या व्यथा मांडल्या. ज्यांनी फेसबुकवर आमदार केराम साहेबांचा फोटो ठेवला होता ते इस्लापूर येथील पत्रकार परमेश्वर पेशवे असल्याने त्यांनी त्या दुबईतील तरुणाची व्यथा ऐकून आप्पारावपेठमधील फुलेनगर येथे जावून त्याच्या आई- वडिलांची भेट घेतल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

आई-वडिलांच्या आशा पल्लवित
पेशवे यांनी त्याच्या आई-वडिलांना आमदार केराम यांची प्रत्यक्ष भेट करून दिली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. या वेळी लवकरात लवकर माझ्या मुलाला मायदेशी परत आणा, असा टाहो आई-वडिलांनी फोडला. केंद्रीय परराष्ट्रमंत्री यांच्याशी सवांद साधून तुमच्या मुलाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रर्यत्न करीन, असे या वेळी आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी दिल्याने आता अशोकच्या आई-वडिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com