
Crime : आक्षेपार्ह मजकुरावरून आष्टीत तणाव; सोशल मीडियावरील अफवांमुळे सातत्याने होतायत वाद
आष्टी : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र वापरण्याचा प्रकार आष्टी शहरात घडला असून याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी तत्काळ संबंधित तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तालुक्यातील बंदोबस्तांत वाढ केली आहे. आष्टी तरुणाने हा वादग्रस्त मजकूर आणि छायाचित्र समाजमाध्यमावर गुरुवारी (ता. आठ) प्रसारित केला.
हा प्रकार समजताच आष्टी येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये शेकडो तरुण एकत्र आले. त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यास सुरुवात करत कारवाईची मागणी केली. हे वृत्त आष्टी तालुक्यात सर्वत्र पसरल्याने तणावाचे वातावरण तयार झाले.
दरम्यान यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान संतप्त झालेल्या जमावाने या घटनेच्या निषेधार्थ आज आष्टी बंदची हाक दिली होती. त्यानुसार आष्टी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत सर्व व्यापार व्यवहार आज पूर्णपणे ठप्प होते.
या घटनेनंतर तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, पोलिसांनी आष्टीसह तालुक्यातील बंदोबस्तात वाढ केली आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवली आहे.