हिंगोली : गुंज येथे मतदान केंद्रावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण, प्रतिष्ठितांसह १२ जणांवर गुन्हा 

राजेश दारव्हेकर
Sunday, 17 January 2021

वसमत  तालुक्यातील गुंज येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वसमत शहर पोलीस ठाण्याचे गजानन पुरी हे आपले कर्तव्य बजावत होते.

हिंगोली : तालुक्यातील गुंज येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ( ता. १५) घडली होती. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसह इतर दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंज येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वसमत शहर पोलिस ठाण्याचे गजानन पुरी हे आपले कर्तव्य बजावत होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच दुपारी तीनच्या सुमारास गावातील काही राजकीय प्रतिष्ठित नागरिकांसह इतर दहा ते बारा जणांनी मतदान केंद्रावर एकत्र येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केली. 

पोलिस कर्मचारी गजानन पुरी यांनी सदरील मंडळीला शंभर मीटरच्या बाहेर जाण्याचे सांगून देखील बुथ ताब्यात घेण्याच्या उद्देशाने श्री पुरी यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. तसेच दगडांनी मारहाण केली व  जिल्हा निवडणूक अधिकारी हिंगोली यांचे मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. गजानन पुरी यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात राजकीय प्रतिष्ठीत नागरिकांसह तर दहा ते बारा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. चवळी करीत आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on a police officer posted at a polling station at Gunj, crime against 12 persons including dignitaries hingoli news