जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत आज होणार फैसला 

भास्कर बलखंडे
Thursday, 24 October 2019

विधानसभा निवडणूक : मतमोजणीची जय्यत तयारी

जालना -    जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत बुधवारी (ता. 24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. पाचही मतदारसंघांतील मतदान केंद्रावर महसुली कर्मचाऱ्यांसह कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणीनंतर आमदारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, ते स्पष्ट होईल. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून, त्यावर प्रत्येकी तीन कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय गरजेनुसार अन्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. 

जालना मतदारसंघ 
जालना मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल, वंचित आघाडीकडून अशोक खरात या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे. या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. बड्या नेत्यांना मतासाठी प्रचारात सभा, बैठका घेतल्या. असे असले, तरी मतदार नेमकी कोणाला पसंती देतात हे निकालनंतर स्पष्ट होईल. वंचितचे उमेदवार अशोक खरात मते मिळविण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावरच विजयी उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

बदनापूर मतदारसंघ 
या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे नारायण कुचे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे बबलू चौधरी यांच्यात लढत आहे. वंचित आघाडीच्या वतीने राजन मगरे हे रिंगणात आहेत. श्री. कुचे आणि श्री. चौधरी यांच्यात थेट लढत होईल, अशी चर्चा आहे. वंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे कोणाची मते खेचतात, यावरच विजयी उमेदवाराचे मताधिक्‍य ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात जबरदस्त चुरस निर्माण केली होती, हे मात्र निश्‍चित. त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयी होते, याविषयी लोकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. 

परतूर मतदारसंघ 
या मतदारसंघात महायुतीच्या वतीने पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सुरेशकुमार जेथलिया यांच्याशी लढत होत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने यांनीही रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. लोणीकर यांच्यासाठी सभा घेऊन साऱ्या देशाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयी होते, याबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. श्री. जेथलिया यांनीही प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली होती. 
 
भोकरदन मतदारसंघ 
या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होत आहे. तर वंचितच्या वतीने दीपक बोऱ्हाडे हे रिंगणात आहेत. रावसाहेब दानवे यांनी कॉर्नर बैठका घेऊन संतोष दानवे यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला आहे. तर चंद्रकांत दानवे यांनीही दारोदार जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. या मतदारसंघात आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. 

घनसावंगी मतदारसंघ 
या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या वतीने राजेश टोपे, तर महायुतीच्या वतीने हिकमत उढाण यांच्यात लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विष्णू शेळके रिंगणात आहेत. या मतदारसंघात राजेश टोपे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवून प्रचारात आघाडी घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री. टोपे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. तर हिकमत उढाण यांच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तर विष्णू शेळके यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly elections