विविध सेवाभावी संस्था ठरल्या देवदूत ....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

परभणी येथे दररोज किमान पाचशे नागरिकांची जेवणाची व्यवस्था

परभणी : ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’, या म्हणीप्रमाणे येथील विविध सामाजिक, सेवाभावी संस्था संचारबंदीत जेवणाची भ्रांत असलेल्यांसाठी देवदूतच ठरल्या आहेत. दररोज किमान पाचशे नागरिकांना संपूर्ण जेवण देण्याचे काम या संस्था करीत आहेत.
वीर सावरकर विचार मंच, वुई केअर फाउंडेशन, संत कवंरराम सेवामंडळ, म. शि. शिवणकर प्रतिष्ठान, लाँयन्स क्लब प्रिंस या संस्था एकत्र आले असून त्यांनी सामाजिक भावनिक भावनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. संचारबंदीच्या काळात शहरात असे अनेकजण अडकून पडलेले आहेत. ज्यांना घरी जेवण तयार करण्याची सुविधा नाही. तर बाहेर हॉटेल, खानावळी बंद आहेत. अशा परिस्थितीत या लोकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यांना या संस्थांच्या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने त्यांच्यापर्यंत जेवण पोचविण्याचे काम संचारबंदी लागू झाल्यापासून या संस्था वरण-भात-भाजी-पोळी एखादा गोड पदार्थ असं पूर्णान्न देण्याचं काम इमानेइतबारे करीत आहेत.
या संस्थांमध्ये ७० ते ८० जणांचा गट यासाठी कार्यरत असून दररोज सकाळी श्री सरदेशपांडे यांच्या शेतात हे अन्न शिजविले जाते व तेथेच त्याची पॅकिंग करून गरजूंपर्यंत पोचविले जाते त्यासाठी सर्व प्रकारच्या संरक्षक उपायोजनादेखील केल्या जातात.
हेही वाचा - रक्त संकलनासाठी आमदाराचा पुढाकार
१८ विद्यार्थ्यांना घरपोच सेवा

या संस्थामधील संजय रिजवाणी, उद्धव देशमुख हट्टेकर, विकी नरवाणी, सचिन आग्रवाल, सतीश नारवाणी, रोहन माटरा यांना कारेगाव रस्त्यावर श्री. शेरकर यांच्या घरी दोन रूम भाड्याने घेऊन तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्या अठरा विद्यार्थ्यांना केवळ तमीळ भाषा व अर्धवट इंग्रजीचे ज्ञान होते. तसेच ते दोन दिवसांपासून उपाशी होते. तेव्हा त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा तर देण्यात आली. परंतु, दररोज त्यांना एक वेळचे जेवण दिल्या जाता आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची तेदेखील परिसरातील श्री. निकम यांच्यावर जबाबदारी सोपविली. ज्यांच्या घरी चूल पेटत नाही अशांसाठी ही संस्था घेत असलेल्या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance to those in need from a service organization,parbhani news