रक्त संकलनासाठी आमदाराचा पुढाकार 

गणेश पांडे
सोमवार, 6 एप्रिल 2020

ता. १४ एप्रिलपर्यंत दोन हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचा संकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

परभणी ः परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या नियोबद्ध रक्तदान कार्यक्रमास शहराच्या विविध भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून येत्या ता. १४ एप्रिलपर्यंत दोन हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचा संकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी परभणीत रक्ताचा तुटवटा भासत आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेत नियोजनबद्ध रक्तदान कार्यक्रम विधानसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात सुरू केला. परभणी शहराच्या विविध भागांतून ५०० च्या वर महिलांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. ता. ३० मार्च ते १४ एप्रिल या दरम्यान रक्तदानाचा हा कार्यक्रम राबविला जात असून शहरातील नावंदर हॉस्पिटल, सिद्धीविनायक हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व लाईफ केअर ब्लड बॅंक या ठिकाणी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत नोंदणी केलेल्या रक्तदात्यांकडून रक्त संकलित केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे रक्तदात्यांना विशेष पासचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा परभणीत १७१ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

रक्तदानासाठी महिलांची नोंदणी 
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक चार, १२ व १६ मधील महिलांनी रक्तदानासाठी आपल्या नावाची नोंदणी केली असून सोमवारी (ता. सहा) शिवाजीनगर येथील नावंदर हॉस्पिटलमध्ये शालिनी पारवे, मुक्ता नागरगोजे, वंदना कदम, मीरा कऱ्हाळे, सुनीता गिराम, अरुणा कदम, सरस्वती कळसाईतकर, मयुरी कदम, सुजाता पांचाळ आदी महिलांनी रक्तदान केले. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, राजू कापसे, नवनीत पाचपोर, दिलीप गिराम, विशाल कळसाईतकर, गोविंद मेटकर, अंकुश काळे, प्रमोद येन्नावार, पंकज गौतम, आकाश घाळगीर, गोपाळ सोळंके, प्रभाकर दशरथे, अनिकेत कदम, वैभव सोनवणे, किरण मोरे, संदीप गरुड आदी उपस्थित होते.

हेही वाचा ....
 

अभियंत्यांना सुरक्षा किट द्या
परभणी :
कोरोनामुळे लॉकडाउन लावल्याने अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या अभियंत्यांना सुरक्षा किट व विमा सरंक्षण देण्याची मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडउनमध्ये सिमाबंदी, अत्यावश्यक सेवेसाठी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनेक रुग्णालयातदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दिलेली जबाबदारी जिल्हा परिषदेचे अभियंते पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका असल्याने सुरक्षा किट व ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने केली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष सतीश मारबदे, महासचिव सुहास धारासूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Donation Camp by Parbhani MLA,parbhani news