वालूर शिवारात आखाड्यावर राहणाऱ्या पती-पत्नीवर हल्ला, दोघेही गंभीर

W
W

वालूर ः सेलू तालुक्यातील वालूर गावाच्या शिवारात शेतातील आखाड्यावर राहत असलेल्या पती-पत्नीवर रविवारी (ता.दहा) सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीतील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. 

झिरोफाट्यापासून सेलू रस्त्यावर काही अंतरावर गोविंद सखाराम चव्हाण (वय ७०) यांचे शेत सर्वे क्रमांक ३१४ /१ मध्ये शेतजमीन आहे. वालूर-सेलू रस्त्यालगत शेतातील आखाड्यावर गोविंद चव्हाण व त्यांची पत्नी शेशिकला गोविंद चव्हाण (वय ६५) या दोघा पती-पत्नीवर रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरानी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आखड्यावर मोठा रक्तस्त्राव झाला. रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. जखमी पती-पत्नीला सेलू व नंतर परभणीला नेण्यात आले. गोविंद चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड, सरला गाडेकर यांच्यासह वालूर पोलिस दूरक्षेत्र कार्यलयातील पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ पथकाने घटनेचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत सेलू पोलिसांकडून चौकशी सुरु होती, मात्र, गुन्हा दाखल झाला नव्हता.  

पाथरीत गादी दुकानाला शॉटसर्किटने आग 
पाथरी ः शहरातील सेंट्रल नाका परिसरातील एक गादी दुकानाला शॉटसर्किटने आग लागली. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी (ता.दहा) सकाळी साडेदहा वाजता घडली. दरम्यान पालिकेच्या अग्निशमनच्या बंबाने आग आटोक्यात आणली. सेंट्रल नाका परिसरात शेख रसूल यांचे अंजूमन गादी दुकान असून या दुकानात रुई व कापडापासुन गाद्या, उशी, रझई बनवण्याच्या काम करण्यात येते तसेच गादी व्यवसायाबरोबरच फर्निचरचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास दुकानाला आग लागली. ही आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदार व नागरिकांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू, काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत आगीचे लोळ दुकानातून बाहेर पडत होते. या वेळी अग्नीशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले असता अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. तोपर्यंत दुकानातील गाद्या, रुई, फर्निचर, गाद्यासाठी रुईची मशीन, कपडा, शिलाई मशीन, सोफा सेट, कपाट, कुलर आदी साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे जवळपास तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक शेख रसूल यांनी दिली. आग विझवण्यासाठी पाथरी अग्निशमन अधिकारी निखिलेश वाडकर व फायरमन खुर्रम खान व बळीराम गवळी यांनी महत्वाची भुमिका बजावली. 

बोरी पोलिसांची दारूविरुध्द कारवाई 
बोरी ः बोरी पोलिस ठाण्यांतर्गत दारू वाटपप्रकरणी रविवारी (ता.दहा) दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या. येथील पाण्याच्या टाकी जवळ दुचाकी वरून अवैध देशी दारूचे बॉक्स नेताना दोघांना पोलिसांनी पकडले. यामध्ये दोन देशी दारूचे बॉक्स व एक दुचाकी जप्त करून दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. बोरी पोलिसांना अवैध देशी दारू जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून कौसडी वरून वर्णाकडे दुचाकीवरून जात असलेली देशी दारू पकडली. यामध्ये पोलिसांनी एक दुचाकीसह देशी दारूचा बॉक्स जप्त केला असून तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. कारवाई पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कटारे, अनिल शिंदे, शरद सावंत, सिद्धार्थ कोकाटे, चंद्रकांत बेंद्रे यांनी केली. 

चाळीस हजारांची देशी दारु जप्त 
मानवत ः तालुक्यातील केकरजवळा शिवारातील एका शेत आखाड्यावर विनापरवाना गैरमार्गाने साठा करून ठेवण्यात आलेले देशी दारूचे १५ बॉक्स पोलिसांनी रविवारी (ता.दहा) जप्त केले. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील केकरजवळा शिवारात तुकाराम दत्ताराव लाडाणे (वय ५० रा.केकरजवळा) यांनी आपल्या शेत आखाड्यावर विनापरवाना व अवैध मार्गाने दारूचा साठा करुन ठेवण्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. यानुसार रविवारी सकाळी आठच्या सुमारास कारवाई केली असता शेत आखाड्यावर देशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये ३९ हजार ७५० रुपये किमतीच्या देशी दारुच्या ७२० बॉटल आढळून आल्या. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक भारत जाधव, पोलिस नाईक मुंजाभाऊ पायघन, हवालदार केंद्रे सहभागी झाले होते. भारत जाधव यांच्या फिर्यादीवरून तुकाराम दत्तराव लाडाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक यु. एल. माने हे करत आहेत.  


संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com