गुन्हा मागे घे म्हणून खंजरने हल्ला 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 22 March 2020

दोघांनी संगनमत करून एकावर खंजरने प्रणघातक हल्ला केला. ही घटना तीन मार्च रोजी घडली. 

नांदेड : आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे म्हणून दोघांनी संगनमत करून एकावर खंजरने प्रणघातक हल्ला केला. ही घटना तीन मार्च रोजी घडली. उपचारानंतर या प्रकरणात शनिवारी (ता. २१) गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मालेगाव रस्त्यार असलेल्या राधिकानगर येथील प्रथमेश विजय महाजन (वय ३०) यांचा आणि विवेकनगर भागात राहणाऱ्या मारेकऱ्यांचा जुना वाद होता. या वादातून ता. तीन मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथमेश महाजन याला गोकुळनगर भागात स्टेडीअमजवळ गाठले. त्यांच्याशी वाद घालून आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे असे म्हणून त्यांना शिविगाळ केली. एवढेच नाही तर मारेकऱ्यांनी त्यांना थापडबुक्यांनी मारहाण करुन चक्क खंजरने श्री. महाजन यांच्या छातीवर मारले. तसेच उजव्या हातावर खंजरने मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर महाजन यांना ५० लाखाची खंडणी मागितली. 

हेही वाचादोन पोलिस निरीक्षक, दहा कर्मचाऱ्यांचे निलंबन

स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी

या हाणामारीत जखमी जालेल्या महाजन यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात आला. उपचारानंतर प्रथमेश महाजन यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी विवेकनगरच्या दोघांवर ठार मारण्याचा व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. ए. डोके करत आहेत. अटक केलेल्या दोघांची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनीही केली आहे. 

अपहरण करुन खंडणी मागितली

नांदेड : खंडणी मागण्याच्या निमित्ताने एका अल्पवयीन विद्यार्थ्यास दोघांनी दुचाकीवर बसवून अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेऊन मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या गळ्यावर चाकु ठेवून २० हजाराची खंडणी मागितली. त्यानंतर त्याचा साडेनऊ हजाराचा मोबाईल जबरीने चोरुन घेतला. ही घटना भाग्यनगर कमानीजवळ सोमवारी (ता. १६) सायंकाळी घडली. सुटका करुन घेतल्यानंतर पीडीत युवकाने भाग्यनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १८)  दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एक १७ वर्षीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहतो. तो सोमवारी (ता. १६) आपल्या मित्रांसोबत भाग्यनगर कमानीसमोर बोलत थांबला होता. यावेळी एका दुचावरुन तिघेजण त्याच्याजवळ आले. त्यातील एकजण तिथेच थांबला व दोघांनी त्या पीडीत युवकास आपल्या दुचाकीवर बसवून अपहरण केले. अज्ञातस्थळी नेऊन त्याला माराहण केली. एवढेच नाही तर त्याच्या गळ्यावर चाकु ठेवून २० हजाराची खंडणी मागितली. 

येथे क्लिक करान्यायीक व कर्मचारी वर्ग आळीपाळीने काम करणार : न्या. धोळकिया

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

त्यानंतर त्याच्या जवळचा साडेनऊ हजार रुपयाचा मोबाईल जबरीने काढून घेतला. तो मोबाईल परत करण्यासाठी पुन्हा दहा हजाराची खंडणी मागितली. त्याला तिथेच कोंडून ठेवले. पीडीत युवकाने आपली कशीबसी सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने आपल्या पालकांना सांगून भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अपहरण, खंडणी यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack with a danger as a retraction of crime nanded news