पोलिसांवर हल्ला करून, पुन्हा याल तर...

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 जानेवारी 2020

फौजदार व पोलिसांनाही मारहाण करून पुन्हा याल तर पाय तोडू अशी धमकी दिली. हा प्रकार अर्धापूर येथील गवळीगल्ली येथे रविवारी (ता. १९) जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. 

नांदेड : आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लोहमार्ग पोलिस पथकावरच आरोपीच्या नातेवाईकांनी हल्ला केला. यात फौजदार व पोलिसांनाही मारहाण करून पुन्हा याल तर पाय तोडू अशी धमकी दिली. हा प्रकार अर्धापूर येथील गवळीगल्ली येथे रविवारी (ता. १९) जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. 

नांदेडच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या शोधात लोहमार्ग पोलिस ठाण्याचे फौजदार मिलींद सोनकांबळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले होते. पोलिस दप्तरी राम रमेश मेटकरच्या शोधात त्याच्या पत्यावर हे पथक अर्धापूरच्या गवळीगल्ली भागात धडकले. यावेळी राम मेटकर हा घरी नव्हता. यामुळे फौजदार श्री. सोनकांबळे यांंनी त्याच्या नातेवाईकांना राम कुठे गेला असे विचारले. यावेळी तुम्ही आमच्या घरी येऊन विचारणारे कोण असे म्हणून पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना शिविगाळ करून वाद घेतला. 

हेही वाचासलमानखान, शाहरुखखानला शिक्षा

ठार मारण्याची धमकी 

एवढेच नाही तर चक्क त्यांनी या पथकातील श्री. सोनकांबळे यांना व अन्य दुसऱ्या पोलिसांना मारहाण केली. एवढेच नाही तर जर पुन्हा आमच्या घरी आले तर ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. हे पथक तेथून माघारी फिरले. त्यांनी थेट अर्धापूर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक श्री. गुट्टे यांना सांगितला. त्यानंतर फौजदार मिलींद सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १९० रात्री उशिरा मारहाण व शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नांदगावकर करत आहेत. 

येथे क्लिक करामहाराष्ट्रात सीएएला विरोध करणार- अशोक चव्हाण

पोलिस पथकावर वाढते हल्ले चिंतेचा विषय 

जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना शोधून त्यांना अटक करणे हे पोलिसांचे मुख्य काम आहे. अशा आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर अनेकवेळा आरोपीच्या नातेवाईकांडून आरोपीची अटक टळावी म्हणून पथकासोबात वाद घालून वेळप्रसंगी माराहणा करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. नुकताच मुखेड तालुक्यात दोन पोलिसांना एका जत्रेच्या ठिकाणी जमावानी माराहण केली होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा लोहामार्ग पोलिसाच्या पथकाला अर्धापूर येथे नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागले. पोलिसांवर होणारे हल्ले ही बाब अतिशय चिंतेची असून भविष्यात सर्वसामान्यांचा पोलिस यंत्रणेवरील विश्‍वास उडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र पोलिसावर जो काणी हात टाकेल त्याला आम्ही कायद्यानुसार सोडणार नाही. 
विजयकुमार मगर,  पोलिस अधिक्षक, नांदेड.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack the police, if you come back ...