अस्तिक कुमार पांडे नवीन महापालिका आयुक्‍त

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शासनाकडून बीड येथील जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिका आयुक्‍त म्हणून बदली केली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी (ता.चार ) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 

औरंगाबाद - दिवाळीसाठी रजा घेऊन गेलेले महापालिका आयुक्‍त पुन्हा रुजू न झाल्याने महापालिकेत प्रशासकिय यंत्रणा ढेपाळली होती. परिणामी विकासकामे ठप्प झाली होती. या पार्श्‍वभुमीवर शासनाकडून बीड येथील जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिका आयुक्‍त म्हणून बदली केली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी (ता.चार ) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. निपुण विनायक हे दिवाळीसाठी प्रदीर्घ रजेवर गेले होते. रजा संपल्यानंतरही ते रूजू झाले नाहीत, राज्यात निर्माण झालेला सत्तापेच, राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर स्थापन झालेले महाआघाडीचे सरकार या काळात सत्ताधारी पक्षाकडून पूर्णवेळ महापालिका आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न झाले. आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे निवदेनाद्वारे तर प्रदीप जैस्वाल यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महापालिकेला आयुक्त मिळावा म्हणून मागणी केली होती. 

क्‍लिक करा : नांदेडमधील मालमत्ताधारकांना खुशखबर.... 

आयुक्त नसल्यामुळे शहरातील पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते, वीज आदी महत्वाचे प्रश्‍न प्रलंबित होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला समोर जाण्यापूर्वी जनतेचे मुलभूत प्रश्‍न व शहराच्या विकासासंदर्भातील प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्‍तांची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे होते. अखेर बुधवारी (ता. चार) शासनाकडून बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. तसेच आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असेही स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा : महापरिनिर्वाण दिन व इज्तेमासाठी विशेष रेल्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad AMC Commissioner Astik kumar Pande