
खोदकामात आढळलेल्या दगडी कुंड, शिल्पाची पाहणी
औंढा नागनाथ : तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील कनकेश्वरी माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान आढळलेल्या दगडी कुंड, शिल्पाचे दगडी खांब याची पाहणी औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या पथकाने मंगळवारी केली.
नागनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आमदार संतोष बांगर यांच्या निधीतून विविध भागांमध्ये विकास कामे चालू आहेत. याच विकासकामांच्या अंतर्गत नागनाथ मंदिराच्या पूर्वेस श्री कनकेश्वरी देवी (तुळजापूर पीठ) हे नदीच्या आणि तलावाच्या काठावर वसलेले एक सुंदर मंदिर असून, मंदिर खूप पुरातन आहे. परंतु, मंदिराकडे जाण्यासाठी आणि तिथे विसाव्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा नव्हती. त्याच अनुषंगाने आमदार बांगर यांनी त्यांच्या निधीमधून त्याठिकाणी विकास कामे करण्यासाठी निधी दिला आहे. श्री कनकेश्वरी माता मंदिर परिसरामध्ये विकास कामासाठी खोदकाम चालू असताना काही पुरातन दगडी कुंड, शिल्पाचे दगडी खांब आढळून आले होते.
या बाबत ‘सकाळ’मध्येही वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. नंतर पुरातत्त्व विभाग संचालनालय औरंगाबाद येथील पथकाने श्री कनकेश्वरी माता मंदिर परिसरात खोदकामात आढळलेले दगडी कुंड, शिल्पाचे दगडी खांब व जागेची मंगळवारी पाहणी केली. या बाबत येत्या आठ दिवसांमध्ये पुरातत्त्व विभाग संचालनालय औरंगाबाद हे औंढा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना अहवाल देणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभाग तंत्र सहाय्यक अमोल गोटे यांनी दिली.
यावेळी पाहणी करताना तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, डॉ. पद्मनाथ गिरी महाराज, अनिल देव तसेच पुरातत्त्व विभाग औरंगाबाद पथकातील तंत्रसहाय्यक अमोल गोटे, समन्वयक मयुरेश खडके, अमोल कारले, सचिन शिंदे, नीतिश कुलकर्णी, मुख्य पुजारी हरिहर भोपी, नितीन देव उपस्थित होते.
Web Title: Aurangabad Archaeological Department Found Stone Tank In Excavation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..