शहरात घडू शकते पुण्याची पुनरावृत्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

महापालिकेनेच लावली वाट 
एकीकडे नागरिक, बिल्डरांनी नाले गिळंकृत केलेले असताना, दुसरीकडे महापालिकेनेही अनेक नाल्यांची वाट लावली आहे. शहरात ११ ठिकाणी नाल्यांवर भाडेतत्त्वावर विविध संस्था, संघटनांना ९९ वर्षांच्या लीजवर बांधकामासाठी जागा दिलेल्या आहेत. यात सिटी चौकातील बीएमसी बॅंक, अंजली चित्रपटगृहाजवळील सारस्वत बॅंक, जाफरगेट येथील शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, रेल्वेस्टेशन भागातील जागा, औषधी भवन, शिवाई ट्रस्ट, श्रीमान श्रीमती कॉम्प्लेक्‍स, सुराणा कॉम्प्लेक्‍स जागांचा समावेश आहे; मात्र दरवर्षी औषधी भवन नाल्याच्या स्वच्छतेचा खर्च महापालिकेला देते, इतर ठिकाणी नालेसफाईच होत नसल्यामुळे अनेक नाले काठोकाठ भरत आले आहेत.

औरंगाबाद - पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळून अनेकांचे बळी गेले, तर कोट्यवधींचे नुकसान झाले. औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यास पुण्याची पुनरावृत्ती घडू शकते. शहरातील दोन नद्यांसह नाले कुठे बिल्डारांनी, तर कुठे नागरिकांनी दाबले असून, त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने मोठ्या पावसात शहर जलमय होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शहरात खाम, सुखना नद्यांसह ७२ नाले असून, त्यातील १८ नाले मोठे आहेत. लांबी तब्बल ५६ किलोमीटर ८२६ मीटर एवढी आहे. सातारा-देवळाई भागाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर आता नाल्यांची लांबी ६० किलोमीटरपेक्षा जास्त झाली आहे; मात्र या नाल्यांवर जागोजागी अतिक्रमणे करून नागरिकांनी जागा गिळंकृत केल्या आहेत.

अतिक्रमणांचा आकडा हा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे चित्र प्रत्येक वॉर्डात आहे; तसेच नाल्यांशेजारील परिसरातून सर्वत्रच नाल्यात कचरा आणून टाकला जातो. त्यामुळेच नाल्यांत कचरा साचल्याचे चित्र आहे. विशेषतः औषधी भवन परिसर, जयभवानीनगर, बायजीपुरा, संजयनगर, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, औरंगपुरा, उल्कानगरी, कोकणवाडी या भागांतील नाल्यांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. 

त्यामुळे मोठा पाऊस होताच या भागांतील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. या पार्श्‍वभूमीवर तरी महापालिका पावसाच्या पाण्याचा निचरा विनाअडथळा व्हावा म्हणून, नाल्यावरील अतिक्रमणे हटविणार का? असा प्रश्‍न केला जात आहे.

लाखो रुपये गेले नाल्यात  
मोठा पाऊस झाला, की शहराच्या अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरून हाहाकार उडतो. त्यानंतर पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे होतात. अतिक्रमणे हटविण्याच्या घोषणा होतात. मात्र, आजपर्यंत नाल्यांतील अतिक्रमणे जशास तशी आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नाल्यांची लांबी रुंदी ठरविण्यासाठी मोजणी करण्याचा निर्णय घेतला. भूमिअभिलेख कार्यालयाकडून सात नाल्यांची मोजणीही झाली. त्यासाठी १७ लाख रुपये खर्च करण्यात आला. या नाल्यांवर हजारो अतिक्रमणे असल्याचे समोर आले; मात्र हा अहवाल कुठे आहे? हेच प्रशासनाला माहीत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City Rain Flood