
Jalna News : ऐन परीक्षेच्या दिवशी संचमान्यतेचे वेळापत्रक
जालना : औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऐन बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान संचमान्यता शिबिराचे नियोजन दिले आहे. याबाबतच्या गुरुवारी (ता.१६) मिळालेल्या आदेशाने प्राचार्य आणि लिपिक वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे बारावी बोर्डचा मराठी विषयाचा पेपर आहे,तर त्याच दिवशी औरंगाबाद येथे संचमान्यता ठेवण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा सुरु आहेत. लेखी परीक्षेला येत्या ता.२१ पासून सुरुवात होणार आहे. बोर्ड परीक्षेचे नियोजन कनिष्ठ महाविद्यालयांचे युद्धपातळीवर सुरु आहे.
यंदाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शासनाने विशेष आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी यांनी केंद्र संचालक व प्राचार्यांची बैठक घेऊन परीक्षेदरम्यान केंद्रावर गैरप्रकार होणार नाही,याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयाचे एकीकडे नियोजन सुरु असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने चालू शैक्षणिक वर्षातील संचमान्यता प्रस्ताव सादर करण्यात यावेत,असे आदेश जारी केले आहे. हिंगोली जिल्हा वगळता जालना,परभणी,बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालयाचे संचमान्यता सादर करावयाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
ऐन परीक्षेच्या दिवशीच संचमान्यता शिबिर कशासाठी ठेवले,असा सवाल प्राचार्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे बारावी बोर्ड परीक्षा आणि त्याच वेळेस संचमान्यता कशी कामे कशी होतील,एकच व्यक्ती दोन ठिकाणी कसा जाऊ शकेल,याचा साधा विचार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केला नाही,का असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.
बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान फेब्रुवारी मार्च महिना सुरुवात होते.यानंतर एका अर्थाने शैक्षणिक वर्ष संपते. शैक्षणिक वर्षात इतर वेळ अधिकाऱ्यांना दिसली नाही,का असा सवाल मुख्याध्यापक संघटनेने उपस्थित केला आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने साधे बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊ नये काय,असा सवाल उपस्थित होत आहे. एकाच दिवशी दोन महत्त्वाचे कामे कशी होतील, असेही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संचमान्यतेचे वेळापत्रक पुढे ढकलावे,अशी मागणी जुक्टा शिक्षक संघटनेने केली आहे.
ऐन परीक्षेच्या दिवशीच कसे दोन ठिकाणी काम करता येईल. बारावीच्या परीक्षेदरम्यान प्राचार्य आणि लिपिक यांनी कसे औरंगाबाद जावे,हाच प्रश्न आहे. बारावी बोर्ड परीक्षेनंतर संचमान्यता ठेवली पाहिजे. दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा बहिष्कार असल्याने कामे कशी होणार.
— प्रा.सुग्रीव वासरे,जिल्हाध्यक्ष, जुक्टा शिक्षक संघटना