'सकाळ'च्या छायाचित्राची खंडपीठाने घेतली दखल

सुषेन जाधव
Wednesday, 16 October 2019

शहरात असे प्रयत्न कुठे होऊ शकतात, याची केली विचारणा 

औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून, जागतिक वारसा टिकवून ठेवणारे असे प्रयत्न शहरात कोठे कोठे होऊ शकतात याची माहिती घेण्याची सूचना खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी मुख्य सरकारी वकील व रस्त्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेचे वकील रूपेश जैस्वाल यांना दिल्या
आहेत. 

अॅड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात खंडपीठात पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केलेली आहे. याचिकेवरील सुनावणी तत्काळ घ्यावी अशी विनंती अॅड. जैस्वाल यांनी मंगळवारी (ता.15) खंडपीठात केली. दरम्यान, सदर याचिकेवर दिवाळीच्या सुट्यानंतर सुनावणी घेण्यात येईल असे खंडपीठाने स्पष्ट करत 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात छायाचित्रकार सचिन माने यांनी काढलेले छायाचित्र "कैलास मगरे या कलाकाराने हर्सूल तुरुंगाच्या भिंतीवर अजिंठा लेणीतील जातक कथांची चित्रे चितारली आहेत.

या जुनाट भिंतीवरील ही चित्रे अजिंठ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना जागतिक वारशाची आठवण करून देतात' या आशयाखाली प्रकाशित झाल्याचा दाखला दिला. तसेच अशा प्रकारची चित्रे शहरातील विविध उड्डाणपुलाखालील पिलरवर (खांबावर) चित्रित करता येतील का? अशी विचारणा मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व अॅड. रूपेश जैस्वाल यांना करत याचिकेच्या पुढील सुनावणीदरम्यान वारसा टिकवून ठेवणारी अशी चित्रे काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नाहकरत संदर्भातील स्पष्टीकरण द्यावे, असे तोंडी निर्देश मुख्य सरकारी वकील व अॅड. रूपेश जैस्वाल यांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad High Court highlighted picture by Sakal