मस्त चाललंय आमचं...कुरघोडीचं राजकारण!

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर जनतेचे प्रश्‍न पूर्णपणे बाजूला पडले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे.

नागपूर अधिवेशनाप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने शिवसेनेला टार्गेट केले असून, गुरुवारी पाणी योजनेच्या स्थगितीवरून भाजप नगरसेवकांनी 1,680 कोटी लिहिलेल्या (पाणी पुरवठा योजनेची किंमत) टोप्या घालत स्थगिती आदेश उठविण्यासाठी "नागपूरला चला, महापौर नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या गोंधळातच महापौरांनी कामकाज उरकले. 

महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या; पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद शहरातील 1,680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. या निर्णयाच्या विरोधात भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत पुन्हा पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा विषय गाजला. 

भाजपचे राजू शिंदे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी योजना मंजूर केलेली होती. त्यामुळे नागरिकांना आता तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र नव्या "तीन तिघाडा, काम बिघाडा' सरकारने योजनेला स्थगिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते औरंगाबाद शहर असल्याने त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे योजनेसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, अशी टीका शिंदे यांनी केली. शासनाने नेमके काय पत्र दिले याचा खुलासा करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मी स्वतः खुलासा करतो, असे स्पष्ट केले. सुरवातीला त्याला भाजपतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर माजी महापौर भगवान घडामोडे यांनी सहमती दिली. 

पाच वर्षे तुम्ही विरोधकच 
दरम्यान, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी भाजपवर टीका करताना, तुम्हाला पुढील पाच वर्षे विरोधकांचीच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच त्यांनीही जुन्या योजनांना स्थगिती दिली होती, याची आठवण भाजपला करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या योजनांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे जंजाळ म्हणाले. पाणीपुरवठा योजना होणारच आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच उद्‌घाटन होणार असा दावा जंजाळ यांनी केला. 


"नागपूरला चला, आधी नागपूरला चला' 
उपमहापौर विजय औताडे यांनी शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, नव्या सरकारने योजनेलाच स्थगिती दिली. त्याचा निषेध करत मी राजीनामा दिला आहे. आम्ही जनतेत जाऊन आवाज उठवू. त्यापूर्वी तुम्ही नागपूरला जाऊन योजनेला स्थगिती नसल्याचे पत्र घेऊन या, त्यासाठी नागपूरला चला, अशी मागणी केली. त्यानंतर 1,680 कोटी लिहिलेल्या टोप्या घातलेले भाजप नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यांनी "नागपूरला चला, नागपूरला चला' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजीतच महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यानंतर नियमित सभेचे कामकाजही त्यांनी घोषणाबाजीतच उरकले गेले. 
 
तुपे, औताडे यांच्यात खडाजंगी 
सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने भाजप नगरसेवक सभागृहात आले. यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे उत्पन्नवाढीच्या विषयावर बोलत होते. त्याला माजी उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. तास-तासभर बोलतात. यांचे तेच ते किती वेळा ऐकायचे असा प्रश्‍न केला. त्याला तुपे यांनी महापौर पीठासन अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने मी बोलत आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर बोलायचे नाही तर कशावर बोलायचे? असा प्रश्‍न केला. "ऐऱ्यागैऱ्यांनी मला शिकवू नये, असे तुपे यांनी म्हणताच, तुमचे भाषण घरी जाऊन करा, असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर महापौरांनी औताडे यांना रोखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com