आधी कलेसाठी झिजले आता मानधनासाठी पायपीट! 

मधुकर कांबळे 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पोटापुरते देगा देवा, लई नाही लई नाही मागणं या वृत्तीने जगलेल्या लोककलावंतांना वृद्धापकाळात फार अपेक्षा नसतात. त्यांना अपेक्षा असते त्यांची गरज भागेल इतके मानधन मिळावे एवढीच.

औरंगाबाद - आयुष्यभर लोककलेची उपासना केली, कलेच्या माध्यमातुन लोकरंजनाचे काम केले. मात्र, वृद्धापकाळात शासनाचे अतिशय तुटपुंजे असणारे का होईना मानधन मिळावे यासाठी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत  समाज कल्याण विभागाच्या चपला झिजवायच्या. मानधन सुरु व्हावे यासाठी अनेकदा अर्ज केले, प्रस्ताव दाखल केले मात्र मानधन सुरु झाले नाही, अशा वयोवृद्ध कलावंतांची मोठी संख्या आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्‍त 900 कलावंतांनाच मानधन सुरु झाले आहे. शासनाकडून मानधनात आणि लाभार्थी लक्षांकात वाढ केली मात्र खरे लोककलावंत या मानधनापासून अद्यापही वंचितच आहेत. 

राज्य शासनाकडून 1954 - 55 पासून वयोवृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना सुरु केली. राष्ट्रीयस्तरावरील, राज्यस्तरावरील आणि स्थानिक स्तरावरील अशा अ, ब आणि क या तीन श्रेणीमध्ये मानधन दिले जाते. पूर्वी दरमहा 1500 ते 2100 रुपये मानधन दिले जायचे. यात तीन महिन्यांपुर्वी या मानधनात वाढ झाली आहे. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातुन दर वर्षी फक्‍त 60 कलावंतांची निवड केली जायची, या लक्ष्यांकात वाढ करुन ती दरवर्षी 100 अशी करण्यात आली आहे. मात्र नुसते मानधन वाढले ते गरजू कलावंतांपर्यंत योग्य प्रकारे पोहचत नाही. 
 

क्‍लिक करा : औरंगाबाद जिल्हा परिषदेत पुन्हा महिलाराज, यांना मिळू शकते संधी  

अर्ज करून थकले 

पोटापुरते देगा देवा, लई नाही लई नाही मागणं या वृत्तीने जगलेल्या लोककलावंतांना वृद्धापकाळात फार अपेक्षा नसतात. त्यांना अपेक्षा असते त्यांची गरज भागेल इतके मानधन मिळावे एवढीच. जालन्यातील प्रसिद्ध शाहीर अप्पासाहेब उगले म्हणाले, की संपूर्ण हयात शाहिरीमध्ये घालवली, पुरस्कार ठेवायला घरात जागा कमी पडत आहे, प्रमाणपत्रांनी बॅगा भरल्या मात्र शासनाकडून मानधन सुरु व्हावे यासाठी अर्ज करुन करुन आता त्याचा नादच सोडून दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमध्ये तर संगीत नाटकांची परंपरा. नटवर्य लोटू पाटील यांनी त्यांनी तिथल्या रंगभुमीला नावारुपाला आणले. सोयगाव, गंगापुर, खुलताबादसह जिल्ह्याच्या सर्वच तालूक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात कलावंत आहेत. मात्र अनेकांनी मानधनाची अर्ज करुन, उपोषणे, आंदोलन करुनही त्यांच्या पदरी काही पडेनासे दिसत असल्याने त्यांनी अपेक्षा सोडून दिल्याचे ते म्हणाले. 

हेही वाचा : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 819 कोटींची मदत 

सन्मानाने मानधन सुरु व्हायला 
पाहीजे होते : कांचन घोटकर 

ढोलकीच्या तालावर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर थिरकायला लावणारे, ढोलकी आणि संबळ वाजवण्यात व अनेक ढोलकीवादक तयार करणारे ढोलकीसम्राट दत्ता घोटकर सध्या औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचाराचा खर्च न पेलवणारा तरीही कुटूंबिय त्यांच्यासाठी धडपड करत आहेत. काही कलावंतही त्यांच्या मदतीसाठी धडपडत आहेत. रुग्णालयाबाहेर चिंताग्रस्त चेहऱ्याने थांबलेल्या कांचन दत्ता घोटकर म्हणाल्या, की त्यांनी संपुर्ण आयुष्य कलेला वाहुन घेतले. घरात प्रमाणपत्रांनी बॅगा भरल्या आहेत. त्यांना शासनाने स्वत:हून सन्मानित करुन मानधन सुरु करायला पाहीजे होते, मात्र अर्ज करुनदेखील त्यांना अजून मानधन सुरु केले नसल्याचे सांगितले. 

 
सध्याचे मानधन 
 

  • राष्ट्रीयस्तरावरील अ श्रेणीतील कलावंत : 3 हजार 150 रुपये महिना 
  • राज्यस्तरावरील ब श्रेणीतील कलावंत : 2 हजार 700 रुपये महिना 
  • स्थानिक क श्रेणीतील कलावंत : 2 हजार 250 रुपये महिना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad senior artist stipend