
दीपक सिरसाठ
अंधारी (जि. छत्रपती संभाजीनगर) : मृत्यू म्हणजे सगळ्याच यातनांचा अंत, असे मानले जाते. पण, म्हसला बुद्रुक (ता. सिल्लोड) येथील हरेश्वर महादेव मंदिर शेतवस्तीत मात्र मृत्यूनंतरही माणसाला रस्ता छळत राहतो, याचे जिवंत उदाहरण समोर आले. सोमवारी सायंकाळी मृत्यू पावलेल्या ७१ वर्षीय लक्ष्मीबाई सर्जेराव गोराडे यांचा मृतदेह मंगळवारी (ता. २९) स्मशानभूमीत नेण्यासाठी गावकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून अंजना नदीचे पात्र ओलांडावे लागले. चिखल तुडवत तब्बल दोन तास प्रवास करावा लागला.