Aurangabad : आधार प्रमाणिकरण भोवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar Verification

Aurangabad : आधार प्रमाणिकरण भोवले

सोयगाव : प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम खात्यावर आली; पण दोन बँकेच्या खात्यावर आधार प्रमाणिकीकरण केल्याने आणि थकबाकी असताना बँकेचे कर्जखाते रिन्युअल न केल्याने १२८ शेतकऱ्यांचे कर्जखाते गोठविण्यात आल्याचा प्रकार प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम काढताना मंगळवारी उघडकीस आला आहे. त्यामुळे लाभ मिळूनही काही शेतकऱ्यांना ही रक्कम काढता आलेली नाही.

दिवाळीपूर्वी मिळालेल्या प्रोत्साहन पर अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात ४५१ शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले होते. परंतु त्यापैकी ४२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम मिळाली. यामध्ये दुबार आधार प्रमाणिकीकरण केलेल्या व कर्जखाते रिन्युअल न केलेल्या १२८ शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम अडकली आहे.

या शेतकऱ्यांचे कर्जखाते (फ्रीज) गोठविण्यात आले आहे. दुबार आधार प्रमाणिकीकरणाचा फटका काही शेतकऱ्यांना बसला आहे. तर थकबाकीत असताना कर्जखाते रेन्युअल न केल्याने शेतकऱ्यांचे कर्जखाते गोठविण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

तालुक्यात पहिल्या टप्प्यात ४५१ शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र करण्यात आले होते. त्यापैकी १२८ शेतकऱ्यांची कर्जखाते गोठविण्यात आल्याने त्यांना पात्र असूनही रक्कम काढता आली नाही. तर ४२९ पात्र शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात आधार प्रमाणिकीकरण केल्याने त्यांची रक्कम दुपारी उशिरापर्यंत खात्यावर जमा झाल्याने त्यांना मंगळवारी अनुदानाचा लाभ घेता आलेला नव्हता.

त्यामुळे खात्यात उशिरा रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना आता दोन दिवसांच्या सुट्या संपल्यावर या रकमेचा लाभ मिळणार आहे.

तीनशे शेतकऱ्यांना पन्नास हजारांचा लाभ

२२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण बाकी असल्याने या २२ शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणिकीकरण झाल्यावर अंतिम टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जखाते गोठविण्यात आलेल्या १२८ आणि आधार प्रमाणिकीकरण नसलेल्या २२ अशा १५० शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे मंगळवारी केवळ तीनशे शेतकऱ्यांना पन्नास हजारांचा लाभ घेता आलेला आहे.