
औरंगाबाद : नवीन वर्षात पदार्पण करत असताना आपण अनेक संकल्प करतो. जिल्हाधिकारी म्हणून नवीन वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मीसुद्धा काही संकल्प केलेले आहेत. हे संकल्प पूर्ण करत असताना प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेच,
शिवाय यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा राहणार आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
वेरूळ महोत्सव
काही कारणांमुळे अनेक वर्षे या महोत्सवात खंड पडलेला आहे, परंतु आता आपण फेब्रुवारी महिन्यात महोत्सव घेण्याचे नियोजन केलेले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलेला वाव आणि कलाकारांना रोजगार मिळणार आहे.
संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरुज्जीवन
आपल्या जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणून असल्याने येथील पर्यटनस्थळांचे जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानदेखील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
सध्या हे पर्यटनस्थळ बंद असले तरी त्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासन ‘मिशन मोड’वर काम करत आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत वेळोवेळी मंत्रालयात बैठका घेऊन उद्यानासाठी निधीची मागणी करण्यात आल्याने शासनाने उद्यानासाठी पर्यटन योजनेतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तसेच जिल्हा नियोजन समितीतून देखील निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याने लवकरच संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे.
वेरूळ-घृष्णेश्वर मंदिर व परिसराचा विकास
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे ज्योतिर्लिंग आहे. या परिसराचा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
क्रीडा विद्यापीठाच्या कामाला प्राधान्य
जिल्ह्याच्या आणि पर्यायाने मराठवाड्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी क्रीडा विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ६ कोटी ६२ लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
उद्योगांमध्ये गुंतवणूक
ऑरिक सिटी, डीएमआयसी तसेच वाळूज एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगांना सेवा सुविधा कशा प्रकारे पुरविता येतील याला प्राधान्य राहणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग आपल्या जिल्ह्याकडे आकर्षित होतील.
जी-५० परिषदेची तयारी
या परिषदेची बैठक शहरात होणार आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी महानगर पालिकेला निधी प्राप्त झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून शहरातील अनेक विकासकामे होत असल्याने नक्कीच काही दिवसांतच शहराचे रुपडे पालटणार आहे.
पर्यटन- जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा
वेरूळ लेणी, अजिंठा लेणी तसेच इतर पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध असल्याने येथे पर्यटकांचा नेहमीच राबता असतो.
गिरीजामाता मंदिर व परिसराच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून येथील स्थानिक समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे.
सौरऊर्जेवरील जलशुद्धीकरण केंद्र
जिल्हा नियोजन समितीतून ग्रामीण भागात सौरऊर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याची एक संकल्पना आहे. २० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवून बहुतांश गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचा संकल्प आहे.
तसेच या अभियानामध्ये जिल्ह्यातील खाम, शिवना आणि सुखना या तीन नद्यांचा समावेश आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे.
स्थानिक कलेचे ब्रँडिंग
पैठणी, हिमरू, बिदरी या येथील उपजत कला आहेत. त्यांचे ग्लोबल मार्केटिंग करण्याचा मानस आहे. तसेच विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण भूसंपादन मसुदा अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी ४५० ते ५५० कोटीदरम्यान रक्कम लागणार आहे.
शाळांची गुणवत्ता, ट्रान्स्फॉर्मरसाठी निधी
शाळांची गुणवत्ता वाढ- शिक्षणासाठी नियोजन समितीतून स्मार्ट क्लासेस ही संकल्पना मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवता वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वीज रोहित्रांसाठी ‘डीपीसी’तून ४० कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
यामुळे बळीराजाला फायदा होणार आहे. ग्रामीण भागात स्मशानभूमी बांधकामांसाठी ३० कोटींची तरतूद केली आहे तसेच जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे अधिक सक्षम करण्याचे काम अजेंड्यावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.